“बोल साहेबा,काय सेवा करू तुझी?
काय घेणार चहा, कॉफी कि ग्रीन टी?”

हा प्रश्न मला एका मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अतिशय आपुलकीने विचारला होता.
मी त्यांच्या ॲाफीसमधे बहुतेक वर्ष-दिड वर्षानंतर काही महत्त्वाच्या Technical Discussion साठी गेलो होतो. आमचे ऋणानुबंधही तसे चांगले आहेत.

त्यांनी लगेच बेल वाजवली आणि दरवाज्यातून त्यांचा ॲाफीसबाॅय आत आला, मी त्या ॲाफीसबाॅकडे पाहिले आणि म्हणालो – “सतिशला माहित आहे”

आणि त्यानेही हलकेच हसून मान डोलावली साहेबांकडे पाहून सतिशने “तुम्ही, काय घेणार सर? असे विचारले, साहेबांनी त्याला त्यांच्यासाठी काॅफी आणायला सांगितले. तो ही लगेच केबिनमधून बाहेर गेला.

जाताजाता मला एका हाताने नमस्कार केला आणि मी ही त्याला तसाच प्रतिसाद दिला.

“तु या सतिशला कसा काय ओळखतोस? आणि तो ही तुला कसा?
साहेबांनी काम बाजूला ठेवले आणि तोंडाचा चंबू करून एकदम आश्चर्याने माझ्याकडे पहायला लागले..

मी त्यांना शांतपणे आठवण करून दिली की “मागे मी जेंव्हा आलो होतो तेंव्हा हाच होता की आणि मी त्याला सांगितलेले,सकाळी मी काॅफी घेत नाही म्हणून” हे उत्तर ऐकून त्यांचे काही समाधान झाले नाही त्यांनी पुन्हा विचारले, “अरे पण तुला इथल्या ॲाफीसबाॅयचे नाव बरोबर लक्षात कसे?

बर ते एकवेळ तुझी स्मरणशक्ती त्यातल्या त्यात बरी म्हणून मान्य करू पण त्याने तुला कसे ओळखले?

आणि त्याला तू काय घेणार हे त्याला कसे काय कळले वा आठवतेय, हे कसे काय शक्य आहे?
मी त्यांना म्हटले “बरं, थोडा वेळ थांबा आणि पहा तो माझ्यासाठी लिंबु पाणी घेऊन येईल….”

आणि पाच-दहा मिनिटात सतिश केबिनमध्ये आला…..ट्रे मधे काॅफी, कुकीज आणि माझ्यासाठी लिंबूपाण्याच्या ग्लाससह…..

मी सतिशकडे पाहून मनापासून त्याला धन्यवाद म्हटले आणि साहेबांकडे पाहिले तो आम्हाला सर्व्ह करून केबिनमधून बाहेर पडला.

तोपर्यंत साहेब माझ्याकडे, मी काही जादूगार आहे आणि काहीतरी जादूचा प्रयोगच सादर केलाय या थाटात माझ्याकडे कुतूहलाने पहात होते….

“खरं सांग, त्याला कस कळलं तूला लिंबु पाणी हवयं, कारण आपण दोघे तर बरोबरच ॲाफीसमधे आलोय आणि तु तर त्याला आत्ता माझ्यासोबतच भेटलास… हे कसे काय मग आश्चर्य?”

मी खळखळून हसलो आणि म्हणालो, “सर आपण माणसांशी कसे वागतो, काय बोलतो आणि त्यांच्यासाठी काय करतो यावर बरेच अवलंबून आहे” मी सांगत होतो आणि साहेब एकदम कान देऊन ऐकत होते.

मी म्हटले “हा सतिश, या ॲाफीसमधे गेली चार-पाच वर्ष झाली काम करतोय, याआधी मी बऱ्याचदा इथे आलोय, आणि या ॲाफीसमधून निघताना मी नेहमी त्याच्याशी जाताजाता दोन-पाच मिनिटे तरी बोलून जातो….

त्यात, त्याचे घरचे कसे आहेत? तो कसा आहे, बऱ्याचदा साहेब लोकं ॲाफीसमधे नसतात तर मग काय करावे? काही वाचन वगैरे करतोस का? हे मी निघताना त्याला सहजच विचारतो….

“सतिश दुर्गम खेडेगावातून आलेला गरीब पण अत्यंत हुशार मुलगा आहे, आईवडील गावी शेती करतात, तो मुक्तविद्यापिठातून पदवी घेतोय…”

“…..आणि त्याने गेल्या वर्षी BA ची फायनल परिक्षाही दिलीये…..” हे वाक्य जेंव्हा मी त्याच्याच साहेबाला सांगितले तेंव्हा ते फक्त खुर्चीतून तीन ताड उडायचेच बाकी होते.
त्यांनी खुर्चीतून उठून अत्यंत प्रेमाने त्यांचा हात पुढे केला आणि आपुलकीने माझ्यासोबत हॅंडशेक केले…त्यांना उत्तर भेटले होते.

मंडळी, सतिश असो की अजून कोणी आपण या लोकांना त्यांच्या नावाने ओळखण्यामुळे, चारचौघात आपुलकीने बोलल्यामुळे आणि चार चांगल्या गोष्टी (त्यांच्या वैयक्तिक प्रगतीच्या ) सांगितल्या तर त्या कोणाच्याही अंतर्मनाला स्पर्श करतात. ..

मला मुंबईत येऊन वीस वर्षे झाली, आणि माझा स्वानुभव आहे की तुम्हाला माणूसकी, खरे कष्ट, मोठी स्वप्न आणि मुंबई स्पिरीट हे फार मोठ्या प्रमाणात याच कष्टकरी तरूणांमधे दिसेल.

मी ही असाच गावाकडून आलो होतो,तेंव्हा कोणी प्रेमाने बोलले की खुप बरे वाटायचे, चार गोष्टी शिकवायचे, चुकले तर समजून घ्यायचे, मदत करायचे. आजही ते सर्व लोक लख्ख पणे आठवतात आणि मी तर कायमच त्यांचा ऋणांत आहे.

असे कितीतरी “सतिश” कित्येकांच्या लेखी आज फक्त एक ॲाफिसबाॅय,नवे इंजिनियर कामगार किंवा हेल्पर असतील पण ते त्यांच्यात्यांच्या कुटुंबाचे महत्वाचे आर्थिक आधार, कुटूंबप्रमुख असतात, त्यांनाही स्वप्न असतात, परिस्थितीवर मात करण्यासाठीची ते पण लढाईच लढत असतात.

त्यांची विचारपूस करा,त्यांच्याशी प्रेमाने बोला,नावाने हाक मारा शक्य असेल तर नक्की काही मदत करा” आणि पहा, अनुभवा – “माणूसकीची खरी जादू”