माझा एक वर्गमित्र जगप्रसिद्ध जनरेटर बनविणाऱ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट आहे,आम्ही दोघे काॅलेजपासूनचे चांगले मित्र.
मुंबईत काही वर्ष रुममेट म्हणून एकत्र राहिलो,तो सुरूवातीपासून एकाच कंपनीत, प्रचंड मेहनती,अत्यंत हुशार अन प्रामाणिक त्यामुळे कंपनीने त्याला भरभरून दिलेय, तो मुंबई,दिल्ली,बंगलोर करत पुन्हा मुंबईतच स्थायिक झाला.
आज तो त्याच्या क्षेत्रात कमी वयातही उत्तम काम करतोय आणि बक्कळ पैसेही कमावतोय.

त्याचे त्रिकोनी कुटूंब, मुलगी, बायको आणि तो, बायको एका बॅंकेत चांगल्या ऊच्च पदावर, दोघांचे मिळून वर्षाला आठ आकडी ऊत्पन्न दहा-बारा वर्षांपूर्वीच त्याने मुंबईत तीन बेडरूमचा फ्लॅट विकत घेतला होता, तो ही सुखवस्तू भागात आणि आता परत आल्यावर तो तिथेच राहत आहे.

दोन वर्षांपूर्वी तो मुंबईत आला तेंव्हा त्याला कंपनीतील सर्व सहकारी, मित्र, शेजारी नातेवाईक SUV किंवा जर्मन सेडान कार घ्यायचा हट्ट करत होते त्याच्या बिल्डिंग,ॲाफिसमधे,सर्वांकडेच मोठ्या गाड्या होत्या,अगदी त्याची मुलगीही त्याच्या मागे होती.

एक दिवस आम्ही जेवायला दादरला जिप्सीत भेटलो तेंव्हा त्याने हा विषय माझ्याकडे काढला आणि म्हणाला- “अरे,आमच्या कंपनीत हल्ली प्रत्येकजण मोठी कार आणि पेंट हाऊसच्या मागे लागलेत, मी पण Confuse झालोय, काय करावे सुचत नाही”
त्याच्याकडे आधीपासून एक खाजगी कार आहे…आणि कंपनीने ही त्याला एक चांगली सेडान गाडी दिलेलीच आहे.
त्यामुळे मी त्याला म्हटले-
“हे पहा, तुला तशी विकेंडसाठीच या कारची गरज लागेल आणि दुसरे म्हणजे स्टेटस सिंबल…बाकी तुझे आर्थिक गणित जर जुळत असेल मनाला खरच पटत असेल, गरजही असेल तर तुझा तू निर्णय घे.”

त्यानंतर आठवडाभरात त्याचा फोन आला कि मी गाडी घेत नाही,पुढे काही वर्षांनी विचार करतो, तुर्तास मुलीच्या शिक्षणासाठी ते पैसे ठेवतोय, काही म्युचुअल फंड आणि उरलेले FD करतोय म्हणाला.

गेल्या डिंसेबरमधे (2019) त्याच्या पत्नीने मुलीच्या शिक्षणासाठी नोकरीतून ब्रेक घेतला, अगदी आनंदाने….

कारण तशा त्यांच्या Liabilities काही नव्हत्याच. बऱ्यापैकी पैसे असल्याने ती घरूनच शेअर मार्केटचे ही काम पाहते आणि तिघेही आनंदात राहताहेत.

आज जेंव्हा सहा महिन्यापूर्वी आलेल्या कोविडने अर्थव्यवस्थेचे बारा वाजवलेत, बऱ्याच जणांच्या नोकरीवर गदा आलीये,
तेंव्हा मला त्या मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय लोकांची अवस्था पाहवत नाही…

बरेच जण Depression मधे गेलेत, काहींचे घटस्फोटाचे अर्ज तयार झालेत, काहींच्या अचानक नोकऱ्या गेल्यामुळे, व्यवसाय पुर्ण बंद झाल्यामुळे या स्टेट्स सिंबाॅल जपण्याच्या नादात उडालेली भांबेरी,त्रेधातिरपिट स्पष्ट जाणवते.

माझा मित्र वहिनींची नोकरी नाही तरी पुर्णत: तणावमुक्त आहे…

कंपनीशी अत्यंत चांगले संबंध (ऋणानुबंधच म्हणा) असल्याने कसलेही टेंशन नाही…वर कंपनीच त्याला जपतेय, ते ही अत्यंत प्रेमाने, कोणतीही आर्थिक बंधन किंवा ताणतणाव नाहीत!! परवा त्याला सहजच फोन केला होता, दोघांनीही निवांत गप्पा मारल्या, अगदी मनमुराद…..

त्याच्याशी बोलल्यावर पुन्हा #आर्थिकसाक्षरता या विषयाची आपल्या देशाला किती नितांत गरज आहे ते पुन्हा जाणवले.

आर्थिक साक्षरता म्हणजे Needs Vs Wants ची खरी लढाई आहे. आपल्या गरजेचे (Needs) चे मूल्यांकन आपण स्वत:च करणे खुप महत्वाचे आहे ..

मित्र, शेजारी , सहकारी , नातेवाईक यांच्यापुढच्या दिखाव्याने, Comparison मुळे किंवा प्रतिष्ठेच्या हव्यासापायी कोणीच आर्थिक अडचणीत सापडू नये आणि हे पुर्णपणे आपल्या स्वत:च्या हाती असते. आजही आपल्याकडे अनेक आर्थिक व्यवहार भावनेच्या आहारी जावून (मुलाबाळांच्या इच्छेखातर) प्रसिद्धीपोटी, खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा फक्त ब्रॅंड पाहून होतात.

या #कोविड महामारीतून आपण निदान हा आर्थिक साक्षरतेचा धडा तर घेतलाच पाहीजे.

Need Vs Wants ची लढाई विचारपुर्वक करायची. सर्वात महत्वाचे –

“आनंद वस्तूत न शोधता तो आपल्या मनात आणि आपल्या कुटूंबात शोधायचा, जीवन सुखी होईल.”

चला आज इथेच रजा घेतो.