हे काही फक्त अध्यात्मिक वाक्य नाही तर आजमितीस सर्वात मोठे कटू सत्य आहे.

या कोरोना तर काळात कित्येक मोठे उद्योजक, बॅंकर्स, राजकारणी, बिल्डर्स, कलाकार अन पिढीजात संपत्ती असलेले गर्भश्रीमंतही कंगाल झालेत.
गेल्या काही दिवसात अभिनेते, ऊद्योजक तसेच अनेक श्रीमंत लोकही पैसे असूनही आत्महत्या करताहेत.

कुठे थांबायचे हे खरतर प्रत्येकालाच कळायला हवे, बऱ्याच जणांना ते कळायला फार उशीर होतो तोपर्यंत त्यांचे सर्वस्व उध्वस्त झालेले असते. आज आपल्यासमोर इतकी उदाहरणे आहेत तरी माणूस जागाच होत नाही.

पैशाची, प्रसिद्धीची,संपत्तीची हाव स्वस्थ बसू देत नाही, हे सर्व अजून हवे,या अजूनच्या नादात विजय मल्ल्या,ललित मोदी,निरव मोदी आणि अगदी अंबानीपुत्र अनिलही सुटले नाहीत.

गरीबाची पोटासाठी चूक एकवेळ माफ होईल पण यांचे काय? मी जवळपास १५/१६ वर्षांपूर्वी एका कॅार्पोरेटमधे काम करत असताना McKinsey नावाची जगप्रसिद्ध सल्लागार कंपनी आम्हाला सेवा देत होती, त्यांची कामाची पद्धत अन इतर सर्वच बाबी या प्रशंसनीय होत्या,त्यामुळे मला त्याचे फार कौतूक वाटायचे,त्यावेळी त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते रजत गुप्ता इतक्या प्रथितयश आंतरराष्ट्रीय कंपनीचे ते पहिले भारतीय एमडी, ते ही अगदी वयाच्या ४६ व्या वर्षीच. हे त्यांच्या प्रचंड मेहनतीचेच फळ होते,पुढे ते सलग तीन टर्म त्या पदावर होते.

त्यांची गोष्ट फार रोमहर्षक अन आम्हा तरूणांसाठी अत्यंत प्रेरणादायी,त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी वडील आणि १८ व्या वर्षी आई गेली… अगदी आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ते अनाथ झाले.
तरीही पुढे त्यांनी IIT दिल्लीतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्याही पुढे जाऊन हावर्ड विद्यापिठातून MBA चे शिक्षण पुर्ण केले .

१९७३ ते २००७ असा मोठा प्रवास McKinsey बरोबर केल्यानंतर ते युनायटेड नेशन्स, वर्ल्ड इकॅानॅामिक फोरम तसेच अगदी बिल गेट्सच्या संस्थेसोबतही काम करत होते.
या सर्व प्रवासात त्यांनी अतिप्रचंड पैसा कमविला होता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी सर्व सर्व काही होते, तरीही त्यांना ते सर्व अजून हवे होते.

जगातील अतिश्रीमंत व्यक्तींमधेही बरेच दुर्गुण असतात अगदी आपल्या इकडच्या गुंठामंत्र्यांप्रमाणेच त्यांनाही गाड्या, बंगले, खाजगी हॅलीकॅाप्टर्स, विमाने, आलिशान घरे आणि फोर्ब्सचे नंबर्स याची एकमेकांशी स्पर्धा असते.

एवढा पैसा मिळूनही बऱ्याच जणांना तो कधीही संस्कार देत नाही. ते संस्कार मुळातच स्वत:त असावे लागतात. उलट सत्ता आणि संपत्तीने सुसंस्कांराचे रूपांतर कुसंस्कारात होण्याचाच धोका अधिक असतो.

तर पुढे रजत गुप्ता गोल्डमन सॅच मधे गेले, आणि अजून पैसे कमवायच्या हव्यासापोटी एवढी संपत्ती, नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा असतानाही हे महाशय इंसायडर ट्रेडींगमुळे दोन वर्षे जेलमधे गेले. आयुष्यात अंतिम टप्यात मिळाले ते सर्व गेले, सर्व सत्कर्म धुळीस मिळाले.

आयुष्यातल्या या प्रवासात हल्ली अशी खुप लोकं जवळून पाहतोय त्यांना फक्त पळायचेय, जोरात पुढे जायचेय.
कुटूंब, स्वातंत्र्य, मित्रपरिवार, सहकारी यासोबतचा आनंद आणि माणसाप्रती असलेले माणूसपण हे खरचं अमुल्य आहे….

त्यांची आतली घुसमट पहावत नाही, काही ओळखीच्या लोकांच्या बातम्या ऐकल्या की मन अजून अस्वस्थ होते.

एकवेळ निरक्षराला साक्षर करणे सोपे, पण चार पैसे कमविणाऱ्या साक्षर माणसाला आर्थिकसाक्षरता समजावून सांगणे खुप अवघड आहे, त्यातून या अतिश्रीमंतांना, काहीही सांगणे म्हणजे महापाप. “कधीतरी, कुठेतरी थांबायले हवे” हे काही फक्त अध्यात्म नाही तर अत्यंत नैसर्गिक बाब आहे.

आपल्या समोर कितीही पंचपक्वान्न ठेवली तर ती जर योग्य प्रमाणात खाल्ली तरच पचताच, अती सेवनाने जुलाब, ऊलट्या तसेच पचनाचे वाईट आजार हे होतातच…. आपण काय खातोय, कसे खातोय हे ही पाहणे गरजेचे. हे फक्त पैसे कमवितानाच नाही तर वापरताना आणि गुंतवणूक करताना ही ध्यानात ठेवावे.. चोरीच्या मार्गाने, धोका देऊन, फसवणूक करून किंवा अप्पलपोटीपणा करून जमा केलेला पैसा कधीही पचत नाही.

पैशांचे, प्रसिद्धीचे, प्रतिष्ठेचेही आणि विविध पदाचेही अगदी असेच आहे. रजत गुप्ता, सत्यमचे राजू वा हर्षद मेहता किंवा केतन पारिख कितीतरी उदाहरणे आहेत. गुगल करा.

आपल्या प्रत्येकालाच नक्की काय करायचेय, कुठे जायचेय आणि सर्वात महत्वाचे “कुठे थांबायचे” हे कळायलाच हवे.

मी ही आज इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो.

धन्यवाद