आपल्या प्रत्येकाचा आयुष्याचा बराच काळ हा पैसा कमवायला नक्की सुरूवात कशी करायची आणि कमवायला लागलो की अजून जास्त कसा कमवता येईल हे शिकण्यातच जातो, पैशांचे शास्त्रीय व्यवस्थापन शिकण्याअगोदरच तो पैसा खर्च होण्याचे हजारो मार्ग जणू आपली आ वासुन वाटच पाहत असतात.

त्यात मग घर, संसारोपयोगी वस्तू, दागदागिने, गाडी, सणसुद, कपडालत्ता, वेगवेगळी गॅजेट्स, गावाकडचे घर दुरूस्ती किंवा नवी बांधणी, शेतीतले काही प्रयोग, (बऱ्याचदा फसलेले – कारण आपण स्वत: पुर्ण लक्ष देत नाही) बहिणभावाचे शिक्षण किंवा लग्न नंतर आपल्या मुलाबाळाचे शिक्षण, करियर, आईवडीलांची, पतीपत्नींची स्वप्न, अचानक आलेली आजारपणे, थोडेफार पर्यटन आणि मग रिटायर्मेंटचे प्लानिंग, एक ना अनेक प्रत्येक ठिकाणी हा पैसाच लागतो.

कोणीकोणी म्हणतो की “पैसा हे सर्वस्व नाही” पण कटूसत्य असे आहे की “पैशाशिवाय कोणालाच वरीलपैकी काहीच करता येत नाही”आणि हे काहीच केलेच नाही तर त्या माणसाला कोणीही एका पै चीही किंमत देत नाही.

जोपर्यंत हे सर्व आपल्या नियोजनाप्रमाणे चालू असते तोपर्यंत आपण फार जास्त विचार करत नाही, अधूनमधून काही लहानसहान संकट आली तरी त्यांना तोंड देत जगत असतो.

पण खरी समस्या तयार होते जेंव्हा अचानक खुप मोठे संकट ज्याचा आपण स्वप्नांतही विचार केलेला नसतो ते आपल्या समोर उभे राहते आणि आयुष्याचा अगदी पालापाचोळा होऊन जातो….’उध्वस्त होणे’ या शब्दाचा खरा अर्थ समजतो मग आपण कधी नशीबाला दोष देतो, कधी आपल्याला इतरांनी कसे फसविले हे सांगत राहतो, कधी आपल्याला पैसे कमी मिळत होते हे रडगाणे गातो तर कधी कोणी आयुष्याचाच शेवट करून टाकतो.

आता या अचानक आलेल्या कोविड संकटाचेच घ्या ना, कित्येक संसार उध्वस्त झाले, कित्येक उद्योग देशोधडीला लागले, गरीबाची तर दैना झालीच पण मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय आणि अगदी बांधकाम आणि कित्येक क्षेत्रातले अतिश्रीमंत वाटणारी मंडळाही रस्त्यावर आली….

बरं मग हे फक्त कोविडमुळेच झाले का? तर माझ्या मते अजिबात नाही ( काही अपवाद) याआधी ही हजारो उद्योगधंदे अचानक बंद पडलेत, लाखो नोकऱ्या जात राहतात, लोक कर्जबाजारी होतात, आत्महत्या करतात, किंवा अचानक तंत्रज्ञान बदलल्याने कित्येक क्षेत्र शुन्य होऊन जातात, जसे, २००० ते २००३ मधे PCO बुथ बंद पडले, तारयंत्र बंद पडली, टाईपराइटर्स बंद झाले कॅसेट इंडस्ट्री संपली तेव्हा काळासोबत न बदलल्यामुळेही अनेक लोक रस्त्यावर आली आणि यापुढेही येत राहतील… आणि हो, यापुढेही हे कायम होतंच राहिल कारण याच्या मुळ कारणाकडे आपण सर्वच दुर्लक्ष करतो आणि ते म्हणजे आपल्याकडे #आर्थिकसाक्षरता या विषयावरील असलेले अज्ञान आणि त्याहूनही भयंकर आजार म्हणजे आपल्याला सर्व कळते असा असलेला अतिआत्मविश्वास!

आपण जर बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की यातील ९९% लोक हे फक्त आणि फक्त आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने (Financial Mismanagement) केल्यामुळेच संकटात येतात…मग तो गरीब असो की श्रीमंत! त्यांची कारणे वेगवेगळी असतात, माझ्या मागच्या काही लेखांमधे ती सामाविष्ट आहेत आणि पुढेही येतीलच.

यातील सर्वात महत्वाचे कारण असते ते म्हणजे या लोकांनी असे काही संकट येईल याचा विचारच केलेला नसतो त्यामुळे अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी काही आपात्कालीन व्यवस्थाही तयार केलेली नसते.

खरे पाहता अर्थशास्रात या गोष्टीला खुप महत्व आहे.
उत्पन्न, जमा, खर्च, बचत आणि गुंतवणुक या सोबत ही आपत्ती व्यवस्थाही (Crisis Management)आपल्याकडे असलीच पाहिजे.

अगदी आपले रोजचे आयुष्य जगताना याचे अनन्यसाधारण महत्व आहे. फक्त आपण त्याकडे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पहायला हवे. प्रत्येकाकडेच Safety Margins किंवा आपात्कालिन सुरक्षा व्यवस्था नसेल तर हमखास नुकसान ठरलेलेच.

आज आपण या विषयीच समजून घेऊ.

माझ्या ऊमेदीच्या काळात मी मोठमोठ्या औष्णिक प्रकल्पांच्या डिझाईनचे काम पहायचो. त्यात बॅायलर, बऱ्याच महत्त्वाच्या प्रोसेस मशीन्सचे कॅलक्युलेशन्स, त्याच्या Accesorries चे डिझाईनन्सची आकडेमोड पहायचो.

ऊदाहरणादाखल सर्वांनीच पाहिलेली औद्योगिक चिमणी घ्या, याचे डिझाईन करताना बऱ्याच गोष्टी ध्यानात घ्यायला लागतात, जसे की वादळ, वारा, पाऊस, आतून अतिउष्ण वायू, प्रचंड प्रदूषण आणि अजून बऱ्याच संकटांशी झुंजत ती चिमणी कोणत्याही आधाराविना वर्षानूवर्ष उभी ठेवायची असते….

बर तीची उंची आणि आकार इतका आवाढव्य असतो की कोणत्याही परिस्थितीत ती कोसळणार नाही याची पुर्ण हमी घेणे फार महत्वाचे असते.

या चिमणीतून अत्यंत उष्ण-घातक वायू जात असतात तसेच काही केमिकल रिॲक्शनमुळे त्यात सल्फ्युरीक ॲसिड तयार होण्याचाही धोका असतो त्यामुळे ती चिमणी गंजू शकते, तसेच ती लोखंडाची असल्याने तिची झिजही होत असते, या परिस्थितीत तिची जाडी (Thickness) तसेच सपोर्ट डिझाईन करायचो तेंव्हा वरील सर्व घटक गृहीत धरून जो काही आकडा येईल त्यात पन्नास टक्याहून अधिक किंवा कधीकधी त्याहीपेक्षा जास्त सेफ्टी मार्जिन ठेऊन ती बनवायला द्यायचो.

एवढे करूनही चिमणीच्या तळाला एक Drain विंडो तसेच ही घातक द्र्व्य काढायला एक Safety विंडो द्यायलाच लागते. (जरी चिमणीचे मुख्य कार्य तो घातक वायू वरच्या दिशेला सोडायचे असले तरीही तळाला अजून एक!)

आपली सर्वांची लाडकी लालपरी एसटी असो कि आरामदायी बस त्याला पुढे, मागे, ड्रायव्हरसाठी दरवाजे असले तरी शेवटी Emergency Exit असतेच…

चांगले फाईव्ह स्टार हॉटेल असेल, भरपूर मोकळी जागा आणि सुसज्ज अशी अग्निरोधक यंत्रणा असेल, सुरक्षेची जगातील सर्वाधिक आधूनिक साधने असूद्या, तरीही तिथेही Emergency Exit Door आणि सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग दिलेलाच असतो.

हल्ली जवळपास सर्वच गाड्यांमधे एअरबॅग्जची सुविधा तसेच अजून बऱ्याच अत्याधुनिक गोष्टी दिलेल्या असतात तरीही आपण गाडीचा विमा काढतोच, सोबत थ्रर्ड पार्टी विमाही असतोच आणि सर्वात महत्वाचे आपला स्वत:चाही विमा असतो…..

मग हेच सुत्र आपण आर्थिक व्यवहारांबाबतीत वापरायला नको का? आयुष्यात अचानक कितीही मोठे संकट आले तर आपल्याकडे त्यासाठी बऱ्यापैकी शिल्लक (Savings) असावीच…. प्रत्येक गोष्ट आपण ठरविल्याप्रमाणेच होईल असे मानणे म्हणजे चुकीचेच…

कितीही काटेकोर पालन केले तरी आपण माणूस आहोत आणि आपण चूक करू शकतो पण त्या वेळी जर आपल्याकडे सेफ्टी मार्जीन आणि Emergency Exit असेल तर आपल्यावर कधीही संकटासमोर हात टेकण्याची वेळ येत नाही.

ही आपात्कालिन बचत एका वेगळ्याच प्रकारे काढून ठेवायची आपल्या एकूण उत्पन्नाच्या १० ते ३० % रक्कम ही या कामी तर वयाच्या पंचविशीपासूनच साठवायला सुरूवात केली तर पुढे आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी आपण कधीही डळमळून जात नाही. कमविणे आणि खर्च करणे म्हणजे #आर्थिकसाक्षरता नव्हेच. आपण ती बचत कशी करायची, वाढवायची यासाठी माझे याआधीचे ब्लॅाग वाचा.

माझे स्पष्ट मत आहे कि आर्थिक साक्षरतेचे शिक्षण प्रत्येक माध्यमिक शाळेत, महाविद्यालयात आणि प्रत्येक क्षेत्रात व्हायलाच हवे.

हे असे संस्कार झाले आणि यावर खरच कृती झाली तर हाच खरा श्रीमंतीचा मंत्र ठरेल.
माझ्या मते वय वर्ष २२ ते ३५ पर्यंत तर प्रत्येकाने कटाक्षाने बचत, गुंतवणूक आणि कमाईतून काही हिस्सा या अशा संकटसमयी वापरायला बाजुला काढून ठेवावाच….

या वयोगटातील तरूणांनी सोशल मिडीया, डिजीटल स्क्रिन वेळ कमी करून वाचन वाढवावे आणि आपल्या कामातून, कृतीतून जास्तीत जास्त आर्थिक प्रगती करावी….

आपण जर आर्थिक दृष्ट्या साक्षर झालो तरच या जगात टिकाव लागतो नाहीतर आयुष्यभर या पैशांच्या मोहात गाढवासारख्या फेऱ्या मारत राहतो.
तेंव्हा आर्थिक साक्षरतेचे महत्व जाणून घ्या आणि वाटचाल सुरू करा.

धन्यवाद 🙏