वर्ष २००३ क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती,त्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार होते. सर्वांसारखाच मी ही फुरफुरत होतो.
मुंबईत मित्रांसोबत राहत होतो,काम आणि वाचन यामुळे टिव्ही पाहण्यासाठी वेळ तसेच तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही सुविधा नव्हती. काय करावे? कसे करावे? अशा विचारात सर्वच होते, आजूबाजूचेही जास्त कोणी ओळखीचे नव्हते त्यात आम्ही बॅचलर!
लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच 😉 विचित्र त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही याची खात्री!
बरं नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला कि आपण वर्गणी काढून टिव्ही विकत घेऊया आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊया!
झाले, ठरले, खरेदीची जबाबदारी नेहमीप्रमाणे माझ्यावर आली. मग मी पण अगदी पृथ्वीच्या उत्पत्तीचाच शोध लावायचा अशा आविर्भावात भरपूर दुकाने पाहिली, घासाघिस करून करून अगदी दुकानदाराला रडकुंडी आणून शेवटी दोन दिवस आधी टिव्ही केबलसहीत घरी विराजमान केला!
दोन दिवस चर्चा फक्त एकच भारत-पाकिस्तान मॅच,सचिन,शोएब,राहूल, सौरव, द्रविड! ॲाफीसमधेही तेच, मित्रांसोबत घरीही तेच!
दुसऱ्यादिवशी मॅच होती, उद्या काय करायचे हा प्लॅन साग्रसंगीत तयार होता. लहानपणीसारखे परिक्षेचा अभ्यास कर, हे काम कर, ते काम कर हे सांगायला आईबाबा किंवा भाऊ-बहिण येणार नव्हते!
हा विचार सुरू असतानाच साधारणत: रात्री १०.३० वाजता माझा मोबाईल वाजला, बघतो तर मी मागच्याच आठवड्यात ज्यांचा पावडर कोटींगचा प्लांट चालू करून दिला होता त्याचे मालक स्वत:… मी क्षणाचीही विलंब न करता फोन उचलला, काय झाले म्हणून विचारले तर ते म्हणाले कि संपुर्ण प्लान्ट बंद पडलाय आणि कोणालाच समजत नाही नक्की काय झालेय उद्या जर माल डिलीव्हर झाला नाही तर सिमेन्स त्यांची संपुर्ण ॲार्डर रद्द करू शकते त्यामुळे आत्ताच्या आता वसईला जाऊन रात्रीत तो चालू करून दे.
माझ्या तर तोंडातच घास अडकला, काय करावे काहीच समजत नव्हते, मित्र ओरडायला लागले – तू फोनच का घेतला? काहीही कारण सांग पण आता जाऊ नकोस, मलाही तसेच वाटले, म्हटले मध्यममार्ग काढू त्यांच्या फॅक्टरीचा नंबर होताच मी फोन लावला आणि त्यांच्या मॅनेजरसोबत बोललो तर तो ही अत्यंत तणावाखाली असल्याचे जाणवले.
बरं दुसऱ्या कोणाला काही समजत नव्हते आणि भितीही होती कारण तो त्यांच्यासाठी गॅस वर चालणारा पहिलाच प्रकल्प होता.
मी तिथेच राहणाऱ्या एका सहकाऱ्याला विचारले पण त्यानेही मॅचमुळे साईटवर जाण्यास स्पष्ट नकार दिला,इतर सर्व्हिस इंजिनियर्चेही फोन स्विच ॲाफ येत होते, मला काय कळायचे ते कळाले.
मी रात्री ११ ला साईटवर जायचा निर्णय घेतला मित्रांना सांगितले सकाळी मॅच सुरू होईपर्यंत मी परत आलेला असेन.
त्या कस्टमरला फोन केला, तुम्ही काळजी करू नका मी स्वत: निघालोय आणि सकाळपर्यंत प्रोडक्शन काढून देतो.
ट्रेन पकडली आणि पुढे रात्री रिक्षाने त्यांच्या फॅक्टरीत पोहचलो. सर्व लोक माझ्याकडे रागाने पाहत होते (जणू हाच तो ज्याने आमच्या मालकाला आणि आम्हाला गंडवलेय) बर त्यात त्या कामगारांच्या मनात गॅसची भिती वेगळीच!
मी रात्री २ वाजता काय नक्की झालेय याचा शोध घ्यायला ओव्हनवर चढलो, बर्नर, ब्लोअर, पॅनेल गॅसबॅंक सर्व पाहिले काही गोष्टींच्या सेटींग कामगारांनीच बिघडवलेल्या लगेच लक्षात आल्या, त्याचे कारणही लक्षात आलेच ( उद्याची मॅच – दुसरे काय)
सर्व सुरळीत करतच होतो तेवढ्यात त्या कंपनीचे मालक स्वत: फॅक्टरीत दाखल झाले होते. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला, मग पटापट सर्व सेटींग चेंज करून साधारणत: पहाटे ४ वाजता प्लांट सुरू केला.
स्वत: त्या कंपनीचे मालकच फॅक्टरीत आल्याने कोणताही कामगार आता गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता
मॅनेजरनेही खाजगीत कबूल केले की काही नाठाळ लोकांनीच हा प्रकार मुद्दाम केला होता.
प्रोडक्शन सुरू झाल्यामुळे मी निघणार एवढ्यात पुन्हा एकदा सायरन वाजला आणि ओव्हन बंद झाली, मी शांतपणे पुन्हा कामाला लागलो पण यावेळी मला काही समजतच नव्हते, ते मालक माझे अगदी बारीक निरिक्षण करत मलाही ते कळत होते. ते खुप रागावलेले दिसत होते, त्यात काही कामगार त्यांना आमच्या डिझाईनविषयी आणि कौशल्याबद्दल मुद्दाम शंका उत्पन्न होईल असे टोमणे मारत होते.
मी मग इरेला पेटलो, काहीही झाले तरी आता माघार नाही, चवताळून गेलो…पुन्हा दोन तासात सर्व व्यवस्थित करून प्लांट अगदी
व्यवस्थित चालू केला आणि ओव्हनवरच अशी जागा शोधली जिथून मला सर्व फॅक्टरी दिसेल आणि तिथेच खुर्ची टाकून बसलो. जे कामगार किडे करत होते त्यांना काय कळायचे ते कळाले! मी अगदी डोळ्यात तेल घालून निरीक्षण आणि सूचना करत होतो.
मालक नाष्टा आणि दुपारच्या जेवणाला स्वत: बोलवायला येऊनही मी वरच थांबलो रात्री सर्व पुर्ण झाल्यावरच खाली उतरलो!
डोळे लाल झालेले, हात संपुर्ण काळेकुट्ट, कपडे तर विचारता सोय नाही.
तेवढ्यात मालक सामोरे आले अशा अवस्थेत त्यांनी मला कडकडून मिठी मारली, डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले-
“शेर निकला तू तो, बहोत खूब”
ते कामगारही ओशाळले होते. पण त्यांनाही पश्चाताप झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
मी कोणतीही तक्रार न करता सर्वांचे आभार मानले,त्यांनीही डिझाईन उत्तम असल्याचे मान्य केले.
मालक स्वत: त्यांच्या कारमधून मला सोडवायला कांदिवलीला आले. उतरतानाही त्यांनी भरभरून आशिर्वाद दिले.
रात्री उशीरा घरात पाऊल टाकले.
सर्व मित्र भारत पाकिस्तान विजयाचा आनंद साजरा करत होते.
ते सचिन आणि मॅचचा इतिवृत्त सांगत होते आणि मी मात्र क्रिकेट विसरलो होतो.
दिवसभरात एकदाही मला त्याची आठवण झाली नव्हती, माझ्यापुढचे संकट त्यापेक्षा कैकपट मोठे होते,त्यामुळे मला त्या मॅचबद्दल,टिव्हीबद्दल काहीच वाटत नव्हते!
अगदी काही म्हणजे काहीच!
त्या दिवशी आयुष्याचे नवे गणित सुटल्याचा धडा घेतला होता, आमची पण भारत-पाकिस्तान सारखीच मॅच होती जी आम्ही त्या दिवशी जिंकली होतो!
मला माझे ध्येय स्पष्ट दिसत होते, जर त्या क्रिकेट मॅचच्या नादात मी ही गेलो नसतो तर
१. नाव कायमस्वरूपी खराब झाले असते.
२. ती कंपनी ब्लॅकलिस्ट झाली असती ते सर्व कामगार नक्कीच तिथून बेरोजगार झाले असते.
३. एवढे पैसे, संपत्ती असतानाही ते मालक रात्री स्वत: येतात, यात खुप काही आले.
४. क्रिकेटमुळे मला कदाचित काही तासांचा आनंद (जिंकलो तरच) मिळाला असता पण इथे मला आयुष्यभराचा मोठा धडा भेटला!
५. आयुष्याच्या प्रवासात कितीही आमिषं, संकट, अडथळे आले तरी अंतिम ध्येय जे असेल त्याच दिशेने आपली पावले आणि कर्म असायला हवे.
टिप- पुढे ते उद्योजक माझे आयुष्यभराचे मित्र झाले ते आजतागायत! अगदी कौटूंबिक मित्र!
#SaturdayThread #मराठी
#BusinessDots
Recent Comments