मला बाजरीची भाकरी आवडते, मस्त घडीची चपाती, भाजी, डाळ-भात, तळलेले मासे, वडापाव, पोहे, उप्पीट, वेगवेगळ्या चटण्या आणि बरंच काही. बर मला हे पचायलाही सोपे जाते. पण हेच युरोप, अमेरीका, चीन किंवा साऊथ इस्ट एशियातल्या लोकांना आवडायलाच हवं असा आग्रह मी धरू शकत नाही.
आणि त्यांचा पिझ्झा, बर्गर, कॅार्नफ्लेक्स, ब्रेड मला जस्साच्या तस्सा आवडावाच असेही काही नाही. कदाचित तो मला पचेल, रूचेल असेही काही नाही.

बऱ्याचदा अमेरीका आणि युरोपियन लोकांच्या विकासामुळे असेल म्हणा किंवा वर्णद्वेष वा मोठेपणाच्या गर्वामुळे असेल म्हणा भारतीय लोकांकडे आणि भारतीय बाजारपेठेकडे त्यांचा पहायचा दृष्टीकोन वेगळाच आहे.

बरेच लोकं भितीने हे मान्य करत नाहीत पण तिकडे राहणाऱ्या भारतीयांना बऱ्याचदा याचा अनुभव येतोच पण “गिरा तो भी टांग उपर” या आपल्या मुळ स्वभावामुळे तसेच पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला या बोटचेप्या भूमिकेमुळे आपण त्यांना सहसा काही सांगायच्या भानगडीत पडत नाही.

तर मुद्दा हा की परवा अचानक फोर्ड इंडीयाने भारतातून एक्झिट घेतली, त्यावर बरेच लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताहेत आणि आमचाही व्यवसायामुळे वाहनऊद्योगाशी जवळचा संबंध आहे त्यामुळे हा लेखनप्रपंच.

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.७ % लोकसंख्या भारतात राहते. दुचाकी, चारचाकी गाड्या असो, मोबाईल, कंप्यूटर, खाद्यपदार्थ, FMCG चे वेगवेगळे प्रॅाडक्ट असो वा माणसांसाठी लागणारी कोणतीही गोष्ट (गरीबासाठी असो की श्रीमंतांसाठी) आपल्याकडे प्रचंड मोठी बाजारपेठ आ वासुन बसलीये…. त्यामुळे साहजिकच जागतिकीकरणाच्या रेट्यात आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या साधारणपणे ९० च्या दशकानंतर भारतात आल्या.

बऱ्याच कंपन्यांना इथे आल्यानंतर आपल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला नक्कीच त्रास होतो. ऊदाहरणच द्यायचे झाले तर केलॅाग्जचे घ्या. शंभर वर्षापेक्षा जूनी कंपनी पण भारतात मुळे रोवतां रोवतां नाकी नऊ आले. भारतात आले तेंव्हा “आम्ही इथली नाष्ट्याची पद्धत बदलू” म्हणाले पण शेवटी त्यांनाही इथे टिकण्यासाठी उपमा बनवावाच लागला. भारतीय टेस्ट प्रमाणे गोड कॅार्नफ्लेक्स बनवाव्या लागल्या. प्रचंड व्हरायटी आणायला लागली.

दुसरे उदाहरण – जॅानडीअर जेंव्हा भारतात आले तेंव्हा त्यांनी अमेरिकेप्रमाणे ट्रॅक्टर इकडेही दिला आता आपल्याकडे टायरच्या वर असणाऱ्या गार्ड वर दोन्ही बाजूला सहकुटुंब बसायची संस्कृती आहे हे मान्य नसावे त्यामुळे त्यांनी त्यांचीच अर्धवर्तुळाकार डिझाईन दिली. शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टर आणि कुटूंबासाठी कार असते असे त्यांचे म्हणणे असावे. पण पुढे काय व्हायचे के झाले आणि ते आपल्याप्रमाणेच घरगुती बदल करून विकू लागले.

अगदी मॅकडोनाल्ड असो वा डोमिनोज, मॅगी असो की गुगल वा वा अजून कोणीही सर्वांना भारतीय पद्धतीने बदल करावेच लागले.

आता वाहन उद्योगांचे पहा आपल्याकडे मारुती, महिंद्रा, टाटा, बजाज या आणि अजून काही भारतीय कंपन्या तर बाहेरून आलेल्या टोयोटा, ह्युंदाई, होंडा, फोर्ड, जनरल मोटर्स, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्लू, ॲाडी, स्कोडा, व्हॅाल्वो, किया, निस्सान किंवा अजून काही….

यात ह्युंदाई, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि अशा कंपन्यांना भारतीय मानसिकता बरोबर समजल्याने त्यांनी लहान, कमी टिकीट साईझ किंवा भारतीय माणसांना सुट होतील, मग ती कमी किंमत असो की कमी खर्चात होणारा मेंटेनंन्स असो अशा गाड्या बनवल्या, विकल्या आणि विकताहेत.

आपली भारतीय मानसिकता म्हणजे – आखूड शिंगी, कमी चारा खाणारी, जास्त दूध देणारी, पांढऱ्या रंगाची, बहुगुणी, गाय हवी असते. अगदी तशीच चारचाकी गाडीही हवी असते. आता जनरल मोटर्स घ्या किंवा फोर्ड घ्या यांनी तसे प्रयत्न केले नाहीत का तर नक्की करायचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही.

फोर्डची किंवा अन्य कोणत्याही कंपनीची असे संपुर्ण ॲापरेशन खाडकन बंद करायची प्रक्रिया एका दिवसात पार पडत नसते. ती एक अत्यंत लॅागटर्म प्रोसेस असते. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे “ऊद्योग-व्यवसाय भावनांवर चालत नसतात….” ऊद्योगात फायदा नसेल तर जगातला कोणताही ऊद्योग वा त्यांचे प्रोडक्ट काळ टिकत नाही. टाटाच्या नॅनो कारचेच घ्या, इतके मोठे स्वप्न असताना, इमोशनल विषय असतानाही कधी ना कधी तो निर्णय त्यांनी घेतलाच.

फोर्डच्या बाबतीतही असेच झालेय. सततचा तोटा आणि तोटाच ते सहन करताहेत. मागचे तीनचार वर्ष वाहनऊद्योगात मंदी होतीच, त्यावर कोरोनाने कहर केला आणि पुढे सेमीकंडक्टरच्या तुटवड्याने संपुर्ण वाहन ऊद्योगाचे कंबरडेच मोडलेय.

बरं यात यांच्याकडे सर्वसामान्य भारतीय घेतील अशा स्वस्त गाड्या नाहीत, जो लोकल सपोर्ट व नेटवर्क मारुती, ह्युंदाई, महिंद्रा किंवा इतरांकडे आहे तसेही ते बनवू शकले नाहीत. त्यात आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हा टिपीकल अमेरिकन दृष्टीकोन बराच घातक ठरलाय.

आपल्या भारतीय बाजार हा महाप्रचंड आहे, तसाच अत्यंत विशाल प्रदेश, वेगवेगळ्या भौगोलिक, सांस्कृतिक रचना, वेगवेगळी राज्य, विविध आर्थिक स्तर आणि वरून त्यातही अनिश्चितता, वेगगवेगळे स्थानिक नियम व अटी हा अत्यंत क्लिष्ट प्रकार असतो.

बरं हे सर्व असतानाही इथे टोयोटा यशस्वी होते, कोरीयन, युरोपियन तसेच इतर अनेक कंपन्या यशस्वी होतात त्यामुळे भारतीय मानसिकता अभ्यास करण्यात फोर्डला अपयश आले हे कटूसत्य आहे. यात उगीचच एकदंर देशाला किंवा व्यवस्थेला दोष देणे पटत नाही.

आपण जर तटस्थपणे फोर्डच्या कामगिरीचे सिंहावलोकन केले तर पुढील गोष्टी समोर येतात, आणि भविष्यातील पुढील गोष्टींचाही उहापोह होईल.

१. मागच्या काही वर्षात कोणतीही नवी गाडी त्यांनी लॉंच केली नव्हती.
२. फोर्ड एंन्डेव्हर ही मागच्या पाच वर्षांपूर्वी आलेली एकच काय ती मोठ्या टिकीट साईझ किंवा किंमतीची गाडी भारतीय बाजारपेठेत चालली. त्यावरही टोयोटा फॅार्चुनर कायमच वरचढ ठरत होती.
३. फोर्ड आयकॅान असेल, फिएस्टा असेल किंवा इकोस्पोर्ट यापलीकडे त्यांना फार काही व्हेरीयशन्स आणता आली नाहीत, स्वस्त कार किंवा आपल्यापैकी एक ते कधी झाले नाहीत किंवा मेंटेनन्स करताना महाग हा टॅगही तसा फारसा पुसता आला नाही.
४. ह्युंदाई, मारुती सुझुकी, टाटा, महिंद्र, टोयोटा, मर्सिडीझ किंवा रेंज रोव्हर असे कोणत्यातरी एका सेगमेंटमधेही त्यांना शेवट पर्यंत जम बसवता आला नाही.
५. लक्झरी तसेच स्पोर्टी लूक्समधे जर्मन कार भारतात अनभिषिक्त सम्राट आहेत… यापुर्वी फोर्ड फुलफ्लेज्ड भारतात असताना जर त्यांना त्यांच्या मस्तांग सारख्या गाड्या विकता आल्या नाहीत तर इथून पुढे ते त्यात असं काही खास भरीव करतील असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही.

६. कोणताही एक माणूस बॅग उचलून लगेच विमानात बसून अमेरीकेस गेला असं करू शकतो पण एक आंतरराष्ट्रीय मोठी कंपनी असे करू शकत नाही त्याच्या डावपेचांचा भाग आणि चाओस मॅनेजमेंट मधे भरडले जावू नये म्हणून कामगारांना लगेच काढणार नाही किंवा एक्सपोर्टसाठी एखादा प्लांट चालू ठेवू वगैरे वगैरे त्यांना सांगणे भाग आहे.

७. आंतरराष्ट्रीय करारानुसार आणि भारतातील कायद्याप्रमाणेही ते इथल्या ग्राहकांना लगेच वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आपली सर्व्हिस सेंटर, स्पेअरपार्ट बिझनेस इथे पुढील कमीतकमी ७ वर्षे तरी चालू ठेवावाच लागेल.

८. पण उद्योगाच्या साध्या नियमाप्रमाणे इकडची मागणी कमी त्यामुळे भविष्यात जी अवस्था आता प्रिमीअर पद्मिनी किंवा जनरल मोटर्सच्या कोणत्याही ग्राहकाची, किंवा होंडा सिव्हीक गाडीवाल्यांची आहे तशीच होणार.

९. बरं यात त्यांनी भावनिक न होता आता निर्णय घेतला यात त्यांच्या कंपनीचा फायदाच आहे कारण यावर्षी थांबूनही त्यांनी अजून पाच-सात कोटींचे नुकसानच केले असते ते त्यांचे वाचले, तोच पैसा ते इतरत्र वापरून कंपनीची प्रगती करू शकतात. नुकसान होत असतानाही उगीचच खुप पैशांचे असल्याचे सोंग आणणे कोणत्याही कंपनीला परवडणारे नसते. ते स्ट्रेटेजी वगैरे ठिक पण त्यालाही काही मर्यादा असतात. उगीच लोकलज्जेत्सव पांढरा हत्ती पोसणे कोणासही शक्य नाही. त्यात अंत ठरलेलाच.

बरं भविष्यात कधी वाटलेच तर ते पुन्हा येऊ शकतात, लढाई कठिण आहेच पण सकारात्मक राहण्यात तसे गैर काहीच नाही. जर ती कंपनी आणि आपला देश दोघांनाही आर्थिक लाभ होणार असेल तर कदाचित ते त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या घेऊन भारतात यावे.

आता प्रश्न उरतो इथले त्यांचे स्वत:चे कर्मचारी, वेगवेगळे व्हेंडर्स, डीलर नेटवर्क, तिथले कर्मचारी आणि इतर अनेक डायरेक्ट – इंडायरेक्ट पद्धतीने अवलंबून असणाऱ्या लोकांचा…..त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक जीवनाचा…. हा अत्यंत जटिल आणि भावनिक मुद्दा आहे. त्यावर फोर्ड नक्की काय तोडगा काढते हे पाहणे मोठे औत्सुक्याचे आहे.

ज्या पद्धतीने वाहन उद्योग चाललाय त्याप्रमाणे वरील सर्व मुद्दे होंडा, निस्सान, रेनॅाल्ट, आणि बऱ्याच कंपन्यांना लागू होतात. त्यामुळे डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे आपण निसर्ग नियमाप्रमाणे बदलत रहायला हवे. फ्लेक्सिबिलीटी हवी आणि कालसुसंगत बदल करायलाच हवेत. यातून खरं तर अजून खुप काही शिकण्यासारखे आहे आणि त्यातून बोध घेत वाटचालही करणे महत्वाचे आहे.

सूरूवात कितीही चांगली असेल तरी शेवट काय होतो हे जास्त महत्वाचे आणि यात ते गुडविल कसे जपताहेत याची वाट पाहूया.