काही गोष्टी अत्यंत साध्या-सोप्या असतात पण आपण करू करू म्हणत तशाच राहून जातात… हा लेख वाचा, विचार करा , पटला तर उपयोगात आणा. या छोट्याशा कृतीमुळे कुटूंबात, मित्र म्हणून संवाद तर वाढेलच पण विश्वासाचं एक नवं नात तयार होईल.

गुंतवणुकीत सुरक्षा हा मुद्दा अत्यंत गरजेचा आहेच; पण तो इतकाही गुप्त नसावा, की ज्या कुटुंबासाठी हे सगळं चाललंय त्यांनाच त्या गुप्ततेचा भयंकर त्रास होईल. बेसिक आर्थिक नियोजनात याविषयी साक्षर होणे गरजेचे आहे

उद्योग-व्यवसायात उतरल्यानंतर माझा प्रयत्न नेहमी जुन्या-जाणत्या कस्टमरला भेटून त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आणि ते वापरत असलेले तंत्रज्ञान तसेच मॅनेजमेंटचे धडे शिकून घ्यायचे असा असायचा. ज्या गोष्टी आपल्याला पटतील त्या लगेच आमच्या कंपनीत तसेच रोजच्या जगण्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचो. यात एक तर आमचे एकमेकांशी ट्यूनिंगही चांगले जमायचे आणि दुसरे म्हणजे आमचा व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याने दोघांनाही मदत व्हायची. त्यामुळे भेटायचे म्हटले, की कसलीच टाळाटाळ व्हायची नाही. असेच आमचे एक क्लायंट अंधेरीमध्ये होते, अशोक नाव त्यांचे. खरे तर पेंट बेकिंगचा व्यवसाय, पण काळ बदलला तसा त्यांनी त्यात बदल करत पावडर कोटिंगही सुरू केले. मी अगदी २००३०४ पासून त्यांच्याकडे जायचो. गेलो की मी तांत्रिक विषयावर बोलायचो. ते आणि त्यांचे पार्टनर महेश दोघे फायनान्स, अकाऊंट आणि शेअर बाजाराबद्दल सांगायचे.

त्यांचा लघुउद्योग असला तरी १९९५ पासून ते यात होते आणि चांगला जम बसलेला असल्यामुळे बऱ्यापैकी स्थिरस्थावर होते. दोघेही सतत नवनव्या ठिकाणी गुंतवणूक करत आणि अगदी हॅप्पी गो लकी आयुष्य जगायचे. मला बऱ्याच प्रमाणात अर्थसाक्षर होण्याचे महत्त्व पटण्यात या अशा मित्रपरिवाराचा खूप मोठा हात आहे.

सुरुवातीची काही वर्षे आम्ही वर्षातून दोनतीन वेळा भेटायचो; पण पुढे त्यांचे प्लांट एक्सपान्शन तसेच बऱ्यापैकी त्या भागात इतर कस्टमर्सचीही ऑफिसेस असल्याने येणेजाणे वाढले. यात कधीच टाईमपास होण्याचा विषय नसायचा, कारण कायम काही तरी शिकायला मिळायचे. काही तरी त्यांचे काम किंवा नव्या कस्टमरचा रेफरन्स तरी मिळायचा. काहीच नाही तर एकत्र जेवण हाही माझ्यासाठी सोहळाच असायचा.

जसजसे संबंध दृढ होत गेले, तसे पुढे महेशजींनी मला बरेच नवनवीन आर्थिक गुंतवणुकीचे प्रकार सांगितले. त्यासाठी नियोजन कसे करायचे, वैयक्तिक बचत तसेच कंपनीतील बचत कशी वाढवायची, नवे प्रोजेक्ट करताना मार्जिन्स कशी कॅल्क्युलेट करायची, कामगारांचे, सहकाऱ्यांचे पगार वेळेवर होणे हे कोणत्याही कंपनीसाठी अत्यंत गरजेचे असते आणि ते होण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरायला हव्यात, या आणि अशा कित्येक अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत ते मला कायम मार्गदर्शन करायचे.

वर्षामागून वर्षं निघून गेली. मी बऱ्याच वेळा त्यांना भेटायचो. कधी तरी कौंटुबिक विषयही निघायचा; पण ते एकंदर कुटुंब, खासगी आयुष्य तसेच या विषयावर फारच कमी बोलायचे किंवा त्याबद्दल फार काही चर्चा नसायची. माझ्यापेक्षा वयानेही ते दोघेही १५२० वर्षांनी वडील, त्यामुळे तसा पिढीतला फरकही होताच. सर्वांत महत्त्वाचे, एखाद्याला तो विषय काढावा वाटत नसेल तर आपणही फार खोलात जाऊ नये, असं साधं तत्त्व आपण पाळायला हवं. त्यामुळे मग त्यावर कधी बोलणंच झालं नाही.

आता पार्ट टू

गेल्या वर्षी अचानक सर्वांच्याच आयुष्यात कोरोनाचे वादळ आलेकोणीच यातून वाचले नाही. एका बाजूला कोरोनातून स्वतःला वाचवायचं. आपापलं घरकुटुंब सांभाळायचं. सोबतच सहकारी, कामगार मिळून शेकडो कुटुंबंही जपायची. कसंही करून कस्टमरने सर्व्हिस वा कोणतीही ऑर्डर दिली की जिवाच्या आकांताने ती पूर्ण करावी लागायची. आमची एक वेगळीच कसरत चालू होती. इकडे आड अन् तिकडे विहीर. कोरोनाची भीती असली तरी जगण्याची धडपड त्याहून भयंकर होती. आम्ही इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये असल्याने त्या भीतीच्या वातावरणातही काम करत होतो. आम्ही असो की अशोकजी आणि महेशजींची कंपनी, सगळेच लढत होतो. प्रत्येकालाच कामं हवी होती. त्यामुळे बाहेर पडणं क्रमप्राप्तच होतं.

बरं ते काम करता करता बऱ्याच वेळा ओळखीपाळखीच्या लोकांचे फोन यायचे. कधी औषधं हवीत, कधी बेड हवाय, कधी कोणाला पैसे हवेत; तर कधी कोण गेलं याच्या बातम्या यायच्यामन सुन्न व्हायचं. रोज नवनवीन आकडे यायचे, सगळं ऐकून मन बधिर व्हायचं. असंच एक दिवस मी फोनवर बोलत होतोएका गावाकडच्या मित्राला रेमडेसिवीर हवे होते आणि त्याची शोधमोहीम सुरू होतीएक जणाकडे ते होते; पण तो जास्त भाव मागत होता आणि मी निगोशिएट करत होतोबॅकग्राऊंडला अशोकजींचा फोन वेटिंगवर दिसला

मी कसेबसे रेमडेसिवीर फायनल केले आणि त्यांचा फोन कट व्हायच्या आत फोन घेतला. मी हॅलो म्हणणार एवढ्यात अशोकजींचा जोरजोरात रडण्याचा आवाज आलामी काही म्हणायच्या आत ते ‘‘आपला महेश गेलाकोरोनाने घात केला…’’ म्हणून जोरजोरात रडायला लागले. आजवर खूप बातम्या ऐकलेल्या; पण अशोकजींचे रडणे पार अगदी काळीज चिरून टाकणारे होतेमलाही रडू अनावर झाले. काही वेळाने थोडं शांत झाल्यावर त्यांनी सगळं नीट सांगितलं. ते म्हणाले, की महेशला सुरुवातीला कमी लक्षणे होती; पण घरातच ट्रीटमेंट घेणं महागात पडलंतब्येत अचानक रात्रीतच जास्त बिघडल्यानंतर मग घाईघाईने हॉस्पिटलमध्ये हलवलं; पण त्यानंतर सगळं काही इतक्या वेगात घडलं, की काही समजायच्या आत दुसऱ्याच दिवशी ते गेले.

हे सगळंच अत्यंत भयंकर होतं. कसंबसं अशोकजींना सावरलं. दुःखाचा डोंगर मोठा होताअशोकजींना मी त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं तर घरी पत्नी, कॉलेजला जाणारी दोन मुलं आणि आईवडील. हा लॉस त्या सर्वांसाठी भरून येणारा होता.

कोरोना नियमांमुळे कोणत्याच अंत्यविधीच्या कार्यक्रमालाही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे तिकडेही जाऊ शकलो नाही. दहापंधरा दिवसांनी अशोकजींना भेटायला जाऊ असा विचार केला, पण माझ्यासमोरून काही केल्या महेशजी जात नव्हते. नशिबाने म्हणा की योगायोगाने, मी आणि ते फेब्रुवारीतच एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने भेटलो होतो. आम्ही दोघांनीही मस्त गप्पा मारल्या होत्या आणि प्रथमच ते आपण कधी तरी सहकुटुंब भेटू म्हणालेलेत्यात हा झटका. त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचं. 

आता शेवटचा पार्ट थ्री!

एकदोन दिवसांतच अचानक अशोकजींचा मला पुन्हा फोन आलामनात वेगळीच शंकेची पाल (खरं तर) एकच काय खूप साऱ्या पाली चुकचुकल्याआता कोण? काय झालं असेल? ते स्वतः तर पॅाझिटिव्ह नसतील? की घरचे कोणी? मी थोडा चरचरतच फोन उचललातर पलीकडून अशोकजी म्हणाले‘‘प्रफुल्ल, मला तुझी एक अर्जंट मदत हवीय!’’ मी काही बोलायच्या आतच ते म्हणाले‘‘मोबाईल अनलॉक करायचा असेल आणि पासवर्ड माहिती नसेल तर? काय करायचं ते लवकर सांग!’’ मला जी काही जुजबी माहिती होती ती त्यांना सांगितली; पण त्यांनी ते सर्व ट्राय केलं होतं आणि अगदी अगतिकतेने मला फोन केलेला हे लक्षात आलं.

त्यांच्याकडून अधिक माहिती घेतल्यावर कळाले, की तो फोन महेशजींचा आहे आणि घरात तसेच इतर कोणालाच पासवर्ड माहिती नाही. आता दोनतीन दिवस झालेत आणि काही पैसे हवे होते तर बॅंकेत तो फोन नंबर रजिस्टर आहे. त्यामुळे काहीच व्यवहार करता येत नाहीत. पासवर्ड असो की बॅंकेचे युजर नेमपासवर्ड हे सर्व त्याच फोनमध्ये आहेबरं ते फोन सोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले. जोपर्यंत ते ठीक होते तेव्हा अशी कधीच वेळ आली नव्हती आणि अचानक असं काही होईल हे कोणाच्या मनातच नव्हते.

आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा ठाकलेला. अशोकजींनी काही कॅश त्यांच्या घरी पाठवली, त्यामुळे तूर्तास प्रश्न मिटला होता; पण इतर आर्थिक व्यवहारवेगवेगळ्या बॅंकांचे हप्ते, शेअर मार्केटचे व्यवहार, अजून बरेच हिशेब कशाचीच कल्पना तो फोन अनलॉक झाल्याशिवाय कोणालाच येणार नव्हती.

माझे काही मित्र, ओळखीचे लोक अशा अनेकांना फोन केले. काही जुळवाजुळव जमतेय का पाहत होतो. एक सकारात्मक सोर्स मिळाला म्हणून एक दिवस मीच अशोकजींना फोन केला, तर त्यांनी दुसरा धक्का दिलामहेशजींच्या मुलाने काही मित्रांच्या मदतीने फोन अनलॉक करायचा प्रयत्न केला आणि फोनच फॉरमॅट झाला.

इकडे त्यांच्या कंपनीतही दोघांचे जॉइंट अकाऊंट होते, त्यामुळे इकडेही पैसे ब्लॉकबरं र्इमेल, वैयक्तिक सेव्हिंग अकाऊंट, इतर गुंतवणुकीचे पेपर्स घरी कोणालाच, कसलीच कल्पना नाही२१ व्या शतकात सगळं जगच डिजिटल झालं. तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका हे इतकं डोक्यात घुसलंय लोकांच्या, की ते पत्नीला किंवा कुटुंबातील इतर कोणालाच काही सांगत नाहीत किंवा चर्चाही करत नाहीत आणि हे अत्यंत भयंकर आहे.

आज एवढे महिने झालेत, अशोकजींना जेवढं शक्य झालं ते शोधून शोधून ते कसं तरी जुळवायचा प्रयत्न करताहेत. महेशजींच्या घरात प्रचंड आर्थिक तणाव आहे. सुखवस्तू कुटुंब असूनही आज ते अचानक प्रचंड तणाव सहन करताहेत. पैसे आहेत, प्रॉपर्टी आहे; पण सर्व पेपर्स नक्की कुठायेत? काही चुकून नोंदी सापडल्या तर तिथे ते नीट मिळत नाहीत. काही बॅंकांत पैसे आहेत; पण पासवर्ड माहिती नाहीघाईघाईने फोनही फॉरमॅट झालाय. बरं ते खरंच एवढे टेक्नोसॅव्ही नव्हते, की फोनचा बॅकअप वगैरे ठेवतील. महेशजी अनुभवी, या विषयातील बऱ्यापैकी माहीतगार माणूस असताना त्यांच्या कुटुंबाला या परिस्थितीला सामोरे जावे लागतेय. त्यांच्या घरात अगदी कोणत्याच डायरीत पासवर्ड किंवा काही डिटेल्स मिळाले नाहीत.

त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत स्मरणशक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नये. लिखित व्यवहार सर्वोत्तम, हे अगदी बेसिक लक्षात ठेवायचे. भावनेच्या भरात (दु:, भीती आणि अपुरे ज्ञान) असताना निर्णय घेऊ नये. त्याच जोषात फोनही फॉरमॅट झाला. आम्ही आता त्याच्या रिकव्हरीसाठी प्रयत्न करतोय; पण समजा नशिबाने सर्व डेटा मिळाला तरी त्यातही सर्व यूजर नेमपासवर्ड एकत्र असतीलच याची खात्री नाही. कोणतीही वेळ सांगून येत नाही, त्यामुळे निदान कुटुंबाच्या भल्यासाठी तरी ट्रान्स्परन्सी ठेवावी.

हे बऱ्यापैकी पैसेवाले आहेत तरी हे असे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय किंवा एकटाच कमावणाऱ्यांचे अशा वेळी काय हाल होत असतील? खरं तर या आणि अशा समस्या फार कॉमन आहेत. आपल्याकडे बहुतांश ठिकाणी पुरुषसत्ताक संस्कृती आहे. पुरुष सहसा सर्व व्यवहार घरी सांगत नाहीतकित्येक जण तर उधारीचे व्यवहार असेच बोलाचालीवर करतात आणि फसतात. अशा वेळी तर त्या कर्जदारांचे चांगलेच फावते. निदान आपल्या देशात तरी अगदी अपवादानेच लोक मागता अशा गेलेल्या व्यक्तींची उधारी परत करत असतील.

अगदी पतीपत्नी दोघेही नोकरी करत असतील, ते एकमेकांशी पासवर्ड, तसेच सर्व इन्शुरन्स, गुंतवणुकीचे सर्व डिटेल्स, पेपर्स, कन्सल्टंटचे, एजंटचे नंबर, व्यवहार, खरंच शेअर करत असतील का? जर तुम्ही करत नसाल तर आजपासून एक एक्सेल शीट किंवा कोडवर्डसह डायरी बनवा आणि पत्नी किंवा आईवडिलांना ते सर्व नीट समजावून सांगा.

अचानक हा असा प्रसंग कोणाच्याच आयुष्यात येऊ नये; पण आलाच तर काय? आपल्याकडे तर अगदी नोकरीधंदा करणाऱ्या स्त्रियाही सर्रास उत्तर देतात‘‘बाहेरचे सर्व आर्थिक व्यवहार आमचे हे बघतात.’’अरे हे असं कसं चालेल…?

आर्थिक साक्षरतेची ही खरं तर मुळाक्षरं आहेत. बेसिक आर्थिक नियोजनात, गुंतवणुकीत सुरक्षा हा मुद्दा अत्यंत गरजेचा आहेच; पण सोबत तो इतकाही गुप्त नसावा की ज्या कुटुंबासाठी हे सगळं चाललंय, त्यांनाच नंतर त्यामुळे एवढा भयंकर त्रास होईल. यासाठी घरातील कोणत्याही कमीत कमी एका विश्वासू व्यक्तीला तरी आपले सर्व आर्थिक व्यवहार सांगत चला. सर्व पासवर्ड योग्य सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि ते सतत अपडेट करत चला. पैसे कमावणं एक वेळ सोप्पं आहे, पण त्याची सुरक्षा आणि निगा तितकीच महत्त्वाची!