आयुष्यात प्रगती करायची असेल तर पहिल्या भेटीत तरी माणसांसोबत काय बोलावे, कसे बोलावे आणि महत्वाचेकाय बोलू नये हे समजणे फार गरजेचे असते. उद्योग असो की खाजगी आयुष्यगुडविलही अत्यंत मौल्यवान बाब आहे! जेवढे जपू, तेवढे वाढते.

खासगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपूर्वक प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. ते नाते विणल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे करत गुडविल वाढवायचे असते. आनंदाने आणि अभिमानाने पैसे कमवायचे असतील तर हे गुडविल खूप कामी येते. अशाच गुडविलची ही अविस्मरणीय फोटोफ्रेम 

आम्ही उद्योग सुरू केल्यानंतर पहिली काही वर्षं अत्यंत धावपळीची, तसेच नवे तंत्रज्ञान असल्याने फार जिकिरीची होती. तो साधारण २००९-१० चा काळ होता. आम्ही फूड प्रोसेसिंग, बेकरी आणि त्याच्या हिटिंग प्रोसेससंबंधी काही चांगल्या, अत्याधुनिक कल्पना प्रत्यक्षात राबवत होतो. आमची बरीच उत्पादनं आणि तंत्रज्ञान हे युरोप तसेच कोणत्याही पुढारलेल्या देशात मिळत असलेल्या तंत्रज्ञानाशी थेट स्पर्धा करायचे.

आम्हाला स्मॉल स्केलमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत होता; पण मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत म्हणावं असं कॉन्ट्रॅक्ट मिळत नव्हतं. आमची टीम यासाठी खूप प्रयत्न करायची, पण नवी कंपनी आणि इतर अनेक देशी जुने खेळाडू यांच्या राजकारणात आम्हाला ते फार कठीण जात होतं. आमची यंग बिग्रेड मात्र अत्यंत चिकाटीने सर्व प्रोजेक्ट्सवर जोर लावून कामं करायची.  

आमच्या टीमचा उत्साह आणि कष्ट पाहून एक दिवस आमच्याच एका ग्राहकाने मला फोन करून आमच्या सर्व टीमचं आणि तंत्रज्ञानाचं कौतुक केलं… भारतातील मोठ्या आणि नावाजलेल्या बिस्कीट कंपनीतील प्रमुखाचं नाव, नंबर दिला. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमची मीटिंंगही ठरवून दिली. हा खरं तर आमच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता. फोन ठेवताना मात्र त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की, मी फक्त रेफरन्स दिलाय. आता पुढची संपूर्ण जबाबदारी फक्त तुमची…

त्यांच्या भेटीची वेळ साधारण दहा-पंधरा मिनिटांची होती. आता अशा लोकांसोबत (ज्या क्षेत्रात ते जगप्रसिद्ध आहेत त्यांच्यासोबत) बोलायचं म्हणजे मोठं कठीण काम. त्यात, मी त्यावेळी फक्त तिशीत होतो. आमची सर्व टीम माझ्यापेक्षाही वयाने लहान. आमच्या कंपनीसाठी, माझ्यासाठी खरंतर ही सुवर्णसंधी होती. उद्योग-व्यवसाय तर महत्त्वाचा होताच; पण ते साहेब खूप सीनियर आणि या क्षेत्रातले अत्यंत ज्ञानी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांचे प्रचंड बिझी शेड्युल आणि त्यातही ते कुठेतरी बाहेर जाता जाता मला भेटणार होते; पण एकंदर या सर्व गोष्टींचा माझ्यावर प्रचंड ताण आला होता.

या मीटिंगसाठी साधारणत: दोन आठवड्यांचा वेळ होता. मला आमच्या प्रॉडक्ट्सबद्दल पूर्ण खात्री होती. विश्वासही होता; पण त्यांना तो पटणं जास्त गरजेचं होतं आणि तेच खूप क्लिष्ट होतं. सर्व बाजूने विचार केल्यानंतर आम्ही ही मीटिंग एका वेगळ्याच प्रकारे करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीबद्दल बऱ्याच पुस्तकातून, मॅगझिन्समधून, टीव्ही आणि वर्तमानपत्रांतून जेवढी माहिती काढता येईल, ती काढली. अगदी सर्वत्र असणाऱ्या नव्या-जुन्या जाहिरातीही गोळा केल्या. त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, कोणकोणत्या अडचणी आल्या, त्यांनी कशी मात केली, ते आजपर्यंतचा त्यांचा सर्व प्रवास अभ्यासला. ते पूर्वी काय इंधन वापरायचे? आता कोणते तंत्रज्ञान वापरतात? त्यांनी वेळोवेळी बदल कसे केले?

मॅनपॉवर आणि आधुनिक मशिन्स याबद्दलच्या त्यांच्या भूमिका आणि त्याला ते कसा प्रतिसाद देतात, त्यांच्याकडे आता असणाऱ्या मशिन्स आणि त्याचा दर्जा नक्की कसा आहे? या आणि अशा अनेक बाबींचा अभ्यास करून, काही ओळखी काढून त्यांच्याकडे निवृत्त झालेल्या एका चीफ इंजिनियर साहेबांना भेटलो. त्यांच्याकडूनही तेव्हा ते लोक कोणते तंत्रज्ञान वापरायचे, ते जेव्हा नव्या मशिन्स खरेदी करतात, तेव्हा कोणती पद्धत वापरतात, तसेच साहेबांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयीही बारकाईने समजून घेतले.

काही पुस्तके आणि लेखांतून मला एक गोष्ट कळाली होती की, त्यांना त्यांच्या बिस्किटांचे वेगवेगळे फोटोज् खूप आवडतात… मग मी त्यांच्या अगदी पहिल्या जाहिरातीपासून ते अगदी नव्या जाहिरातीपर्यंतचा प्रवास असे एक प्रेझेंटेशन आणि आमची सिस्टीम लावल्यावर त्यात अजून कसे आधुनिक बदल होतील, मालाचा दर्जा कसा सुधारेल आणि त्यांचे पैसेही कसे वाचतील याबद्दलचे सर्व रिपोर्ट बनविले….

शेवटी मीटिंगचा तो दिवस उजाडला. मी भेटायला जाताना त्यांच्या कंपनीच्या बिस्किट्सच्या सर्व फोटोजचा एक छानसा कोलाज करून त्याची छोटीशी, पण सुंदर टेबलटॅाप फोटो फ्रेम करून भेट म्हणून घेऊन गेलो. सकाळी ९ वाजता बरोब्बर आमची मीटिंग सुरू झाली. साधारणत: १०-१५ मिनिटांसाठी असलेली आमची भेट दुपारी २ वाजता संपली. तेही आयुष्यभराच्या ऋणानुबंध अन्‌ अविस्मरणीय आठवणींसह.

त्या दिवसानंतर आज गेली ११-१२ वर्षं आम्ही एकत्र व्यवसाय करतोय. मी त्यांना त्या भेटीनंतर दर दोन-तीन वर्षांनी काही कार्यक्रमांत किंवा व्यावसायिक मीटिंगच्या निमित्ताने भेटत असतो. ते कितीही गडबडीत असले तरी आस्थेने, कामाबद्दल, नवीन तंत्रज्ञान, कुटुंब आणि इतर बाबींवर बोलतात. सर्व चौकशी करतात; पण एक गोष्ट ते न विसरता हमखास सांगतात, ती म्हणजे आपली पहिली मीटिंग आणि ‘ती फोटोफ्रेम’ त्यांना किती आवडली होती ते…!

अगदी आजही त्यांनी ती फोटोफ्रेम त्यांच्या टेबलवर ठेवलीय. कारण त्यांना ती मनापासून आवडलीय. मी त्यांना ती फ्रेम देताना काही सोनं, चांदीचा मुलामा लावून दिली नव्हती; पण त्यात आदर, आपुलकी आणि त्यांच्या प्रॅाडक्टविषयीचा अभ्यास, यामुळे त्यांच्यालेखी त्याचे ‘मूल्य’ अधिक झाले. पैसे कमवायचे असो की माणसं, नेहमी आपली पहिली भेट ही खासच असावी. त्यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी आणि उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी.

Always remember,

Impressions are tough to last. Hence, always try make a best one!

नोकरीसाठीचा इंटरव्यूव्ह असो, व्यवसायासंबंधी काही महत्त्वाची किंवा अगदी पहिली मिटिंग असो वा एखाद्याकडून आपण काही सल्ला मागत असू. आपला पहिला प्रभाव सर्वोत्तमच असावा आणि पुढे प्रत्येक वेळी त्यावर एक एक टप्पा प्रगती होत राहायला हवी.

हल्ली बरेच लोक फक्त जुजबी ओळखीवरून, कधी सोशल मीडियातील एखाद्या मेसेजमुळे किंवा कधीतरी कुठे भेटले म्हणून ‘अमुकतमुक माझा एकदम खास आहे किंवा चांगला मित्र वगैरे आहे’ असे बिनदिक्कत सांगतात. ओळख असणं वेगळं आणि त्यातून आयुष्यभराचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित होणं यात फार मोठी तफावत आहे.

आर्थिक प्रगती करायची असेल तर अगदी पहिल्या भेटीत माणसांसोबत काय बोलावं, कसं बोलावं आणि काय बोलू नये हे समजण्याची फार गरज आहे. बऱ्याचदा – Your energy introduces you before you even speak.

काही लोक फक्त स्वत:चा मोठेपणा सांगण्यासाठीच जणू जन्म घेतात. काही जणू डिटेक्टिव्ह असल्यासारखे फक्त नको ते प्रश्न विचारत सुटतात. त्यात हल्ली ‘विनाकारणच’ राजकारण्यांच्या ओळखी सांगणं तर कंपल्सरी झालंय, ते ‘विचारपूर्वक’ टाळायला हवं.

पर्सनल टचसाठी खासगी वा व्यावसायिक आयुष्यात चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मनःपूर्वक प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं आणि ते संबंध प्रस्थापित झाले की मग आपलं काम प्रामाणिकपणे करत राहत ‘गुडविल’ वाढविण्यासाठी सतत कार्यरत राहायचं. आनंदाने आणि अभिमानाने पैसे कमवायचे असतील तर हे ‘गुडविल’ खूप कामी येतं आणि त्याचा पाया हा अगदी पहिल्या भेटीपासून घातला तर तो अधिक मजबूत होतो.