विज्ञानतंत्रज्ञानाने माणसाचे जीवन अधिक सुखकर होते. खर तर प्रत्येकाने वेळ काढून त्यावर विशेष चिंतन करायला हवे. त्यामुळे नवी दिशा तर मिळतेच शिवाय आपल्या वैचारिक कक्षाही रुंदावतात. आता जगभर इलेक्ट्रिक गाड्यांची चर्चा आहे, त्यावरील फायदेतोट्यांची ही चिकित्सा…!!

भारतात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्या बाल्यावस्थेतआहेत. इलेक्ट्रिक गाड्यांना उच्च प्रतीच्या बॅटरीनिर्मितीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल (लिथियम) आपल्याकडेनाही. आपल्याकडे सर्वाधिक वीज उत्पादन औष्णिक ऊर्जेवरतसेच मोठ्या प्रमाणात कोळशावरच होते.

ही वीज स्वस्त आहे, पण ती पर्यावरणपूरक निश्चितच नाही. आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाशी झुंजायचे असेल तर अपारंपरिक ऊर्जास्रोत्रांचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यात डिझेलपेट्रोलवरील गाड्या स्विच झाल्या तर उलट भयंकर वीजतुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज घेऊन नियोजन हवे.

Future will be of Low-Carbon Economy & Green fuels will help for sustainable development and consistent growth!

तूर्तास इलेक्ट्रिक वाहने घेताना आपण का आणि कशासाठी घेतोय, याची उत्तरे शोधा. मगच त्याची खरेदी करा.

इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक बस याचे प्रचंड फायदे हल्ली प्रत्येक जण सांगत असतो. हा विषय आजकाल इतका चर्चेत असतो की बरेच जण तर आपण किती जागरूक आणि ॲडव्हान्स आहोत, हे दाखविण्यासाठीही या गाड्यांबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल माहिती देत असतात. मी बऱ्याचदा हा विषय चालू झाला की शांतपणे काही न बोलता ऐकून घेतो. आपल्या भारतीयांना तसे नव्या शोधांबद्दल, नव्या गॅझेट्सविषयी हल्ली जास्तच जिज्ञासा दिसून येते. ती तशी चांगली गोष्ट आहे. कदाचित यामुळे का होईना आपल्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या जगासाठी काही नवे शोध लागू शकतात. नाहीतर आपण शोध लागल्यावर जुने रेफरन्स काढून क्रेडिट घेण्यापलीकडे हल्ली फार काही करत नाही. मी अजिबात इलेक्ट्रिक कारविरोधी नाही; पण तंत्रज्ञान समजून घेण्यास आणि नवीन शिकायला कायमच तत्पर असतो. त्यासंबंधी सुदृढ चर्चा व्हायला हवी आणि त्यासोबत अधिक ज्ञानाची भर पडायला हवी. 

आता जेव्हा कधी हा इलेक्ट्रिक गाड्यांचा विषय निघतो तेव्हा याचे जे काही फायदे सांगितले जातात, ते पुढीलप्रमाणे आहेत

  • प्रदूषण पूर्णपणे कमी होते. परिणामी ‘कार्बन उत्सर्जन’ कमी होण्यास मदत होते.
  • या गाड्या पर्यावरणपूरक आहेत आणि यामुळे एकंदर पृथ्वीवरील हवामानाचे संरक्षण तसेच संवर्धन होते.
  • ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर हा फार नामी उपाय आहे. याचे दीर्घकालीन फायदे प्रचंड आहेत.
  • सर्व प्रगत देशांत या गाड्या वापरल्या जाताहेत आणि खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान यात वापरले जातेय.
  • इलॉन मस्क आणि त्याच्या टेस्ला कंपनीविषयीची काही वाक्ये निश्चितच असतात.
  • येणाऱ्या काळात सगळ्या जगभर याच गाड्या असणार आहेत. त्यामुळे आपल्यालाही आता इलेक्ट्रिक गाड्यांशिवाय पर्याय नाही.
  • सर्वात महत्त्वाचे – बॅटरी, चार्जिंग स्टेशन्स, या गाड्यांच्या डीलरशिप तसेच या संबंधित व्यवसायात उतरायची ‘हीच ती वेळ आणि हाच तो क्षण’ असे ठामपणे बिंबवले जाते.
  • डिझेल, पेट्रोल किंवा गॅसच्या तुलनेत या गाड्यांचा मेंटेनन्स फारच कमी आहे.
  • इंधनाचे दर आता गगनाला भिडताहेत आणि या गाड्यांची रनिंग कॉस्ट (मायलेज/ ॲव्हरेज) हे डिझेल, पेट्रोल किंवा गॅसच्या तुलनेत खूप कमी आहे. आपल्या खिशाला नक्की परवडेल अशी आहे.

आता हे सर्व ऐकल्यावर आपल्याला नवल न वाटले तर आश्चर्यच. आपल्याला यात न पटण्यासारखे काहीच नसते. त्यामुळे आपण आपसूकच हे सर्व प्रमाण मानतो आणि हेच मुद्दे गरज पडेल तसे पुढच्यावेळी इतरांना ऐकवतो. आम्ही बरीच वर्षे ऊर्जा, त्याचा योग्य वापर आणि ऊर्जेचे संवर्धन या क्षेत्रात कार्यरत असल्याने बऱ्याच वेळा या तंत्रज्ञानावरील आधारित कारची निर्मिती तसेच पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत आणि वेगवेगळ्या प्रकाराने होत असलेल्या वीज निर्मितीचा अभ्यास करताना काही मुद्दे आम्हाला महत्त्वाचे वाटतात.

  • आपल्या भारतात सर्वाधिक वीज उत्पादन औष्णिक ऊर्जेवर व कोळशावरच होते. त्याचे प्रमाण खाली पायचार्टमध्ये दिलेय. तसेच विविध प्रकारे होणारी वीजनिर्मितीही तक्त्यात दाखविली आहे. आपण मुंबई, पुण्याचे किंवा कोणत्याही मोठ्या शहरांचे प्रदूषण कमी करण्याच्या नादात नागपूर, चंद्रपूर किंवा इतर ठिकाणी जिकडे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत तिकडे पाठवतो. बरेच जण यावर उत्तर देतात की, शहरात लोकसंख्येची घनता जास्त आहे. म्हणून इकडचे प्रदूषण कमी करणे जास्त फायद्याचे आहे. हे म्हणजे आपल्या घरातील घाण शेजाऱ्याच्या घरात टाकण्यासारखेच आहे. दुसरा मुद्दा कोळसा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण हे काही शहर किंवा कोणत्या जिल्ह्याशी किंवा देशाशी संबंधित नसून ते एकंदर पृथ्वीच्या हवामान बदलाशी संलग्न आहे. त्यामुळे प्रदूषण हे प्रदूषणच असते, त्याचे दूषण अशा कारणांनी संपत नाही.
  • भारताचा विचार केल्यास इलेक्ट्रिक गाड्यांना उच्च प्रतीच्या बॅटरी निर्मितीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा कच्चा माल (लिथियम) आपल्याकडे नाही. आपण इतर देशांवरच अवलंबून आहोत. (तेही अतिशय महाग दर देऊन) आजही जगभरात मोबाईल फोन्स, चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची निर्मिती खोळंबलेली आहे. . कारण प्रोडक्शनसाठी लागणाऱ्या सेमी कंडक्टर चिप्स उपलब्ध नाहीत. आपण अशा गोष्टी आजही भारतात बनवू शकत नाही. इलेक्ट्रिक गाड्यांची दुसरी समस्या म्हणजे यांच्या बॅटरीजचा तयार होणारा ई-कचरा. यावर अजून बरेच संशोधन व्हायला हवे.
  • भारताचा विचार करता येथील प्रत्येक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी ही बाल्यावस्थेत असल्याकारणाने तंत्रज्ञान आणि सुरक्षितता यांवर फार न बोलणेच बरे. आजमितीस बरेच लोक उपलब्ध असलेल्यापैकी कोणतीही गाडी घेत आहेत. त्याचे सांगितलेले ॲव्हरेज आणि प्रत्यक्ष मिळत असलेले ॲव्हरेज यात फार मोठी तफावत आढळते. यात सुसूत्रता यायला हवी.
  • अमेरिका, युरोपातील फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, चीनसह इतर अनेक देश मोठ्या प्रमाणावर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे वळले आहेत आणि त्यांनी कोळशावरील वीजनिर्मिती नियोजनपूर्वक कमी केली आहे. संपूर्ण जगभरात ”नेट झिरो कार्बन गोल” नावाने मोठी चळवळ उभी राहतेय. यात संपूर्णपणे ऊर्जानिर्मिती ही जीवाश्म इंधनांशिवाय (कोळसा, डिझेल, गॅस किंवा इतर हायड्रोकार्बन्स) करण्याचा मानस आहे. भारतात सध्या तरी बऱ्याच बाबी या पेपरवरच असून ठोस कृती झाली तरी पुढे कमीतकमी दहा वर्ष अपेक्षित पर्याय उपलब्ध व्हायला लागतील.
  • सध्या आपल्याकडे पुरेशा चार्जिंग स्टेशन्सची कमतरता आहे. स्वच्छ वीजनिर्मिती, आवश्यक कच्चा माल किंवा पूर्णपणे जगभर वापरले जाईल, असे भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्याचा मंद वेग आणि मुळातच फक्त रिव्हर्स इंजिनिअरिंग किंवा कॉपीपेस्ट करण्याची अपप्रवृत्ती यामुळे लगेच येत्या वर्ष-दोन वर्षांत काही हाती लागेल, याबद्दल शंका वाटते.
  • भारतात वेळोवेळी सरकारी धोरणात बदल करण्याची पद्धत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यामधील संघर्ष तसेच धडाधड दरवर्षी पॉलिसीमध्ये होणारे बदल, यामुळे जागतिक स्तरावर भारतातील उद्योगक्षेत्रातील विश्वासार्हतेबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह असते. सरकार बदलले की, आपल्याकडे पॉलिसी सहज बदली होतात, ही अत्यंत वाईट बाब आपण सोडली पाहिजे.
  • आज भारतात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी कोळशावर निर्मित होणारी वीज निश्चितच स्वस्त आहे, पण ती पर्यावरणपूरक निश्चितच नाही. आपल्याला या ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाशी झुंजायचे असेल तर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे अनिर्वाय आहे.
  • भारतात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण होत आहे. भविष्यात भरपूर उद्योगधंदे इकडे वाढतील. आपल्याकडे लोकसंख्या वाढीचा दरही प्रचंड आहे. नवी घरे त्यासाठी बांधली जाताहेत. शेतीसाठीही मोठ्या प्रमाणावर वीज लागेल. या सर्व बाबींसाठी आता आहे अधिक ऊर्जेची. आताची ऊर्जानिर्मिती ही घरगुती, व्यावसायिक, शेतीसाठी तसेच उद्योगांसाठी कशीबशी पुरतेय. त्यात या डिझेल, पेट्रोलवरील गाड्या स्विच झाल्या तर उलट भयंकर वीज तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी अत्यंत अचूक आणि भविष्याचा अचूक अंदाज घेऊन नियोजन हवे.
  • आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर पुढील दशकभरात समाधानकारक चित्र उभे राहू शकते. न्युक्लिअर ऊर्जेवरही भारतात खूप काम करणे गरजेचे आणि बाकी आहे. त्यासोबतच आपल्याला येणाऱ्या काळात जगाशी स्पर्धा करायची असेल तर खालील प्रकारांच्या अपारंपरिक वीजनिर्मितीवर भर द्यावा लागेल.
  • जलविद्युत प्रकल्प
  • सौरऊर्जा निर्मिती
  • पवनऊर्जा निर्मिती
  • समुद्राच्या लाटांवरून ऊर्जानिर्मिती
  • जिओथर्मल ऊर्जानिर्मिती
  • बायो इंधनासह ऊर्जानिर्मिती

हे सर्व अक्षय ऊर्जेचे स्रोत म्हणून ओळखले जातात आणि हे येणाऱ्या काळात कधीही संपणार नाहीत. त्यामुळे आपला क्रूड ऑईल आयात करून होणारा भरमसाठ खर्चही कमी होऊ शकतो. तसेच याचा प्रचंड वापर आपण देशाच्या एकंदर प्रगतीसाठी करू शकतो. या सर्व ऊर्जेच्या निर्मितीसाठी येणारा अवाढव्य खर्च हे भारतात याची मुळे आजवर न रुजण्याचे मूळ कारण आहे. सरकारने विशेष योजना कृतीत आणून यावर भर देण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व ऊर्जेचा एकदा येणारा खर्च जरी अधिक असला तरी याला चालविण्यासाठी कोळसा किंवा गॅस असे कोणतेही इंधन लागत नसल्याने तसा हा प्रकल्प चालविण्यास नंतर काहीच खर्च येत नाही. ज्यांना इलेक्ट्रिक गाड्या घ्यायच्याच आहेत, त्यांनी घरावर सोलर पॅावर प्लांट लावले तर मात्र ते सर्वोत्तम आणि खरे खुरे नेट झिरो कार्बन गोल ठरेल