आपल्याला बऱ्याचदा वाटते की अचानक भरपूर पैसे मिळावे आणि मग आपण आयुष्यभर सुखी, समाधानी होऊ तर ते पुर्णपणे चूक आहे. संपुर्ण आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर ज्ञान, अनुभव आणि सतत कष्ट करण्याची क्षमता याला पर्याय नाही.

वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे पैसे येत असतात. काही रातोरात करोडपतीही होतात, पण आलेले पैसे कसे वापरावे, गुंतवणूक कशी करावी हेच अनेकांना कळत नसते. त्यामुळे रातोरात मिळवलेला गर्भश्रीमंतपणाही कंगाल होतो. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यातलाच एक करोडपती झालेला सुशीलकुमार. त्याच्या आयुष्यात आलेले चढउतार आपल्याला अर्थसाक्षर होण्याचाच रस्ता दाखवतो आहे. 

हल्ली एका रात्रीत स्टार बनण्याचे, प्रसिद्ध होण्याचे आणि घर, गाडी, बंगला, नोकरचाकर सर्व काही दारात असण्याचे स्वप्न पाहण्याचे प्रमाण खूप वाढलेय. त्याला बहुतांश वेळा आपल्या आजूबाजूची परिस्थिती कारणीभूत असते. टीव्ही, सिनेमा आणि समाजमाध्यमं यांचा हल्ली इतका प्रभाव आहे, की लोकांना सगळं कसं सोप्पं सोप्पं वाटतं. बरं कधी कधी अशा अशक्यप्राय गोष्टी आपल्या समोर घडतात आणि मग आपलाही त्यावर आपोआप विश्वास बसत जातो, परंतु जर तुम्हाला वाटत असेल, की भरपूर पैसे मिळाले की आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि तुम्ही आयुष्यभर सुखी, समाधानी राहाल; तर ते पूर्णपणे चूक आहे.

संपूर्ण आर्थिक सुरक्षितता आणि आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल तर ज्ञान, अनुभव आणि सतत कष्ट करण्याची क्षमता याला पर्याय नाही. नेहमी आपण अशा प्रकारच्या यशाची एकच बाजू पाहतो आणि आपल्या कामाला लागतो, आज आपण या यशाची दुसरी बाजू जाणून घेऊ.

या फोटोतला सुशीलकुमार आठवतोय? २०११ मध्ये या पठ्ठ्याने ‘कौन बनेगा करोडपती?’ या टीव्हीवरील मालिकेत पाच कोटी रुपये जिंकले होते; तेही स्वत:च्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या बळावर… तो खरोखर एका रात्रीत करोडपती तर झालाच आणि स्टारही बनला. त्याच्याकडे एवढे पैसे आले की इतर काहीही काम करायची गरजच काय, असा समज झाली. मग सुरू झाला एक अलौकिक आणि अनोखा स्वप्नवत प्रवास. विविध कार्यक्रमांना हजेरी, मिळालेल्या यशाबद्दलचे सत्कार, मग तिथे मार्गदर्शनाच्या सभा, हे करत असताना समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी देणगी देणे वगैरेही सुरूच होते. हे सर्व अगदी दर महिन्याला.

लोक काहीही कारण सांगून त्याच्याकडून पैसे घेऊन जायचे… पैसे असलेल्या माणसासोबत तसाही आपला समाज गोडच बोलतो. अगदी तो पैसा वाममार्गाने कमवला असला तरी त्याच्यासाठी स्तुतीच असते. यातही त्याने स्वत:च्या बुद्धीच्या जीवावर पैसे कमावलेले, त्यामुळे मग अजून त्यात भर… हिंदीत सुप्रसिद्ध म्हण आहेच-‘मन तारीफ का गुलाम होता है’- आणि याच सर्व प्रकारात सुशीलकुमार वाहत गेला.

पुढे त्याचे मित्रही स्वार्थीच निघाले, जसे पैसे संपत आले तसे हे सर्व त्याला सोडून गेले. जाताना भरपूर दारूचे, सिगारेटचे व्यसन मात्र लावून गेले… त्यात याला आर्थिक बाबी हाताळण्याचा कोणताही विशेष व्यावहारिक अनुभव नसल्याने कोणत्याही व्यवसायात तो पैसे गुंतवत गेला… नको ती संगत आणि अचानक आलेला भरपूर पैसा यामुळे सद्सदविवेकबुद्धीच नष्ट झाली होती. त्याला सिनेमा बनवावा वाटू लागला. धडाधड सिनेमे पाहू लागला. एकच सिनेमा कित्येक वेळा पाहत बसायचा. हे सर्व सुरू असताना त्याच्या बायकोसोबतही त्याचे खटके उडू लागले. पुढे तो याच क्षेत्रात करियर करण्यासाठी मायानगरी मुंबईत दाखल झाला… चित्रपट आणि मालिका निर्मिती क्षेत्रात धडपड केली; परंतु यातही त्याला फार ज्ञान आणि तांत्रिक माहिती नसल्याने सहा महिन्यांत बस्तान उठवावे लागले… या सर्व प्रकारात त्याचा घटस्फोट होता होता वाचला. पुढे सुशीलकुमारकडील सर्व पैसे संपले. त्याचे करियरही उद्ध्वस्त झाले. जे लोक पैसे आल्यावर त्याच्या पुढेमागे करत होते, ते आता त्याला टाळू लागले. सर्वांनीच त्याला बेदखल केले.

आता कसा तरी तो सावरतोय. दोन गायी घेऊन त्यांच्या दुधावर आता त्याची गुजराण सुरू आहे. हे सर्व त्याने अलीकडे स्वत:च सांगितले. शेवटी तोच म्हणतो – “it’s important to have little needs in life and work towards fulfilling it.” आपल्या गरजा कमी केल्या की पैसा तर वाचतोच, पण आनंदही वाढतो. Need Vs Wants चा फरक फार स्पष्टपणे कळायला हवा.

आपल्या आजूबाजूसही आपण बरेच अशा प्रकारचे लोक पाहत असू. जमिनीच्या विक्रीतून किंवा एखाद्या अचानक वेगळ्या पद्धतीने एकदम पैसे येतात. लगेच सुरू होतो असाच विविध कलागुण दर्शनाचा खेळ. आपण हे टाळायला हवे.

पैसे असणे, कमवणे हे गरजेचे आहेच; पण त्याहून कठीण काम म्हणजे ते पैसे आपण नक्की कसे वापरतो, त्याची कशी गुंतवणूक करतो यावर आपण गरीब राहणार की श्रीमंत होणार हे ठरते. आपल्याकडे भरपूर पैसे आले की सर्व ठीक होते असे नाही. त्यासाठी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व किती आहे ते समजून घ्या, शिका आणि जागृत व्हा!