वेळ आणि पैसा दोन्ही विचारपुर्वक गुंतवला तरच फायदा..धसमुसळेपणाने वापरला की संपला! वेळेचे नियोजन जमले तरच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम, साक्षर स्वतंत्र होऊ शकतो. वेळेचे नियोजन आणि आर्थिकसाक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.

वेळेची गणितं पुन्हा घासूनपुसून नीट केली की गाडी पुन्हा रुळावर येते. कोणताही उद्योग असो, सरकारी खासगी संस्था असो वा प्रोफेशनल आयुष्यज्याने वेळेचे नियोजन काटेकोर, अचूक आणि उत्तम केले आणि त्यावर अंमल सुरू केला, तर त्याचे आयुष्य आनंदी असण्याची शक्यता अधिक असतेआणि ती तुमच्या भविष्याच्या आर्थिक स्वातंत्र्यप्राप्तीची नक्कीच सुरुवात ठरु शकते. 

श्रीमंत आणि गरिबांमध्ये नक्की काय फरक असतो? पैशांचा फरक तर असतोच, तो सर्वांनाच माहिती आहे आणि दिसतोही. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे ते आपल्याकडे असलेल्या वेळेचा वापर नक्की कसा करतात हा… गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तास आहेत आणि त्यात १४४० मिनिटेच आहेत. आपण आपल्याकडे असलेली ती वेळ नक्की कशी वापरतो, त्या वेळेत काय काय करतो, यावर आपण गरिबाचे श्रीमंत होणार की श्रीमंताचे पुन्हा गरीब होणार हे ठरते.

अगदी लहानपणी शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत वेळेचे नियोजन आणि त्याचा वापर हे गुपित सोडवायचे मी शिकतोय… आजही त्यात नवनवे प्रयोग करत असतो. नव्या पद्धती, नवे तंत्रज्ञान शिकतोय. माझा ठाम विश्वास आहे की वेळेचे नियोजन जमले, तरच आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम, साक्षर आणि स्वतंत्र होऊ शकतो.

तसे पाहिले तर वेळेचे नियोजन आणि पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण किती वेळ काम करतो, यापेक्षा आपण नक्की काय आणि कशासाठी काम करतोय, याची स्पष्टता हवी. यामुळे आपल्याला वर्तमानातले तसेच भविष्यातलेही नेमके आर्थिक उत्पन्न ठरवता येते. त्यामुळे आपल्याला कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक स्थैर्य लाभते.

आता उदाहरणच द्यायचे झाले, तर कल्पना करा की तुम्ही तुमच्या शहरातल्या वा जवळच्या अत्यंत प्रसिद्ध रेस्तरॉंमध्ये सहकुटुंब जेवायला गेलाय… तुम्हाला सर्वांनाच चांगली जोरदार भूक लागलीये… पण तिकडे सर्व टेबल फुल आहेत. तुमच्यापैकी कोणीतरी रांगेत नंबर लावून उभा आहे आणि वेटर, रिसेप्शनवरील माणूस आणि इतर सर्वच कर्मचारी धावपळ करताना दिसताहेत… तुम्हाला बराच वेळ वाट पाहिल्यावर टेबल मिळते, तुम्ही थोड्या वेळात ऑर्डरही देता. आता जेवण येण्याची वाट पाहत असता; पण तुमचे पदार्थ वेळेवर येतच नाहीत… तुम्ही इतरांच्या डिशेसकडे पाहत असता… तुमची मुलंबाळंही तेच करायला लागतात; मग दादा, मामा केल्यावर कसंतरी तुम्हाला तुमचे जेवण टेबलवर मिळते, मग रोटी संपते, त्याची ऑर्डर पूर्वीच देऊनही ती वेळेवर येत नाही.. वेटरला वारंवार सांगूनही तो मुद्दाम पाहूनही न पाहिल्यासारखं करतो… तुमची चिडचिड होते… तुम्ही पूर्णपणे थकून जाता… मुलाबाळांकडे पाहात नकळत कपाळावर हात मारता आणि इथे परत कधीही न येण्याचे मनोमन ठरवता…कदाचित अजून भूक असते, बरेच काही खायची इच्छा असूनही वेळेत जेवणाचे पदार्थ वा वेळेवर सेवा न मिळाल्याने आपण इतर ऑर्डर मनातल्या मनातच कॅन्सल करतो.

आता याची दुसरी बाजू पाहा – त्या हॅाटेलचे कर्मचारी, मालक, मॅनेजर, कुक सर्वच जण पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत काबाडकष्ट करत असतात. त्यांना काही तुम्हाला त्रास द्यायचा नसतो किंवा मुद्दाम वाईट सर्व्हिसही द्यायची नसते; पण वेळेच्या अयोग्य नियोजनामुळे, एकाचवेळी अचानक खूप ग्राहक आल्यामुळे सर्व यंत्रणा कोसळून जाते. त्यात त्यांचेही मानसिक स्वास्थ्य बिघडते; पण कायमस्वरूपी आर्थिक तोटाही सहन करावा लागतो, कारण एकदा तुटलेले गिऱ्हाईक पुन्हा त्यांच्याकडे येईलच याची खात्री संपलेली असते. बरं मौखिक स्वरूपात तसेच हल्ली इंटरनेटद्वारे बाहेर जी बदनामी होते, त्यामुळे नवे येणारे लोकही यायच्या आधीच गायब होतात. त्यामुळे भविष्यातलेही वेगळे नुकसान.

केवळ काबाडकष्ट करून, घाम गाळून आणि सतत बिझी राहून फायदा नसतो, त्यासाठी योग्य वेळ निवडावी लागते. वेळेचे आणि कामाचे नियोजन (Time Management) करावे लागते. आपल्यासोबतच इतरांच्याही कामाचे प्लॅनिंग त्यांना समजून घ्यायचे, ज्यांना गरज असेल तिथे मदतीचा हात आणि आपण संकटात असताना त्यांच्याकडून मदत घ्यायला हवी… बरं हे तत्त्व कोणत्याही व्यवसायात, कामात, आपल्या रोजच्या जगण्यात लागू पडते…

कोणतंही काम करताना ते खरंच करायला हवे का? कोणत्या वेळी तुम्हाला अधिक सहजपणे काम करायचेय, कोणत्या वेळी जास्त कष्ट घ्यायचेत, छोटी कामं ताबडतोब हातावेगळी केली तर येणारे बरेच मोठे प्रॅाब्लेम आधीच टाळता येतात. आपल्या कामाचे व्यवस्थित नियोजन केले, तरच त्यातून आर्थिक फायदा होईल आणि फायदा झाला तरच बचत…! पुढे गुंतवणूक आणि मग आर्थिक स्वातंत्र्य!

आता हीच गोष्ट कॅार्पोरेट किंवा आपल्या रोजच्या आयुष्यातही लागू पडते. एक-दोन मिनिटांच्या फोन कॅालसाठी किंवा पाचएक मिनिटांच्या योग्य आणि महत्त्वाच्या कामासाठी बरेच लोक –

१. थोड्या वेळाने करतो.

२. संध्याकाळपर्यंत करतो.

३. एक-दोन दिवसांत किंवा काही दिवसांत करतो.

४. दुसरं कोणीतरी करेल, मी बिझी आहे.

अशी कारणं देत केवळ काम पुढे-पुढे ढकलत असतात, ही अशी उत्तरं देणारी माणसं आयुष्यात कधीच उंच झेपावू शकत नाहीत. आहे त्याच जागेवर वा त्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन १०० टक्के बाद होतात. योग्य वेळेवर आपण उपलब्ध असणे, हे फार गरजेचे असते… त्यातून आपली एक प्रतिमा बनते आणि त्यातूनच तुमचे गुडविल बनते. हे गुडविल आपण जेवढे लवकर तयार करायला लागू, तेवढे ते चक्रवाढ पद्धतीने वाढते.

साधारण २००१ मध्ये मी जेव्हा मुंबईत प्रथमच आलो, तेव्हा मोबाईल, लॅपटॅाप, गुगलमॅप, व्हॅाट्सॲप लाईव्ह लोकेशन, कोणाशी ओळखपाळख वा इथली काहीच माहिती नव्हती, पण इथल्या संस्कृतीमुळे काटेकोर वेळ पाळायची सवय लावली. त्यात काही मजेशीर सूत्र ठरलेली असायची… त्यामुळे वेळेचे महत्त्व कळत गेले.

एखाद्यास भेटायचे असेल वा सोबत जायचे असेल तर – अंधेरी, प्लॅटफॅार्म नंबर एकच्या इंडीकेटरच्या खाली सकाळी ६ वाजून २१ मिनिटांची लोकल… अमुकअमुक रंगांचा शर्ट घातलेला माणूस भेटेल… या काही ओळींच्या शस्त्रामुळे वेळ पाळायची सवय लागायला खूप मदत झाली… माझी कधीच लोकल पकडायची वेळ चुकली नाही आणि चांगले संस्कारही अंगवळणी पडले.

आजही बऱ्याचदा काही वेळा चुकतो तेव्हा वेळेची गणितं पुन्हा घासूनपुसून नीट केली की गाडी पुन्हा रुळावर येते. कोणताही उद्योग असो, सरकारी खासगी संस्था असो वा प्रोफेशनल आयुष्य… ज्याचे वेळेचे नियोजन काटेकोर, अचूक आणि उत्तम, त्याचे आयुष्य आनंदी असण्याची शक्यता अधिक असते.

आजमितीस जगातल्या वेगाने वाढणाऱ्या आणि चांगला नफा कमाविणाऱ्या कंपन्या, मग त्या ॲमेझॅान असो, फेडेक्स, खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरी करणाऱ्या स्टार्टअप्स किंवा उबेर, ओला, झोमॅटो यांसारख्या कंपन्या घ्या, या सर्वांचे सिक्रेट हे कमीत कमी वेळात आपल्या वस्तू वा पदार्थ आपल्यापर्यंत आणून देणे… त्यांच्या व्यवसायांच्या गुपितांची मुळे वेळेच्या नियोजनात लपलेली आहेत. आपला वेळ हे खूप मोठे धन आहे आणि त्याचा वापर आपण कसा करतो, हे फार महत्त्वाचे आहे.

समाज माध्यमात किती वेळ द्यायचा?

आपल्या कामासाठी किती वेळ द्यायचा?

स्वत:मधील सुधारणांसाठी किती वेळ द्यायचा?

मनोरंजनासाठी किती वेळ द्यायचा?

आपले कुटुंबीय तसेच खऱ्या जीवनातील मित्रांना किती वेळ द्यायचा?

या प्रश्नांची उत्तरे जर शोधली, आपल्याकडील वेळेचे नीट नियोजन केले आणि त्यावर अंमल सुरू केला तर ती भविष्याच्या आर्थिक स्वातंत्र्यप्राप्तीची ही सुरुवात असेल…. हे वेळेचे नियोजन आणि आर्थिक साक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!