ज्ञानी माणसाकडे अज्ञानी माणसापेक्षा धन, यश आणि आनंद येण्याची शक्यता अधिक असते. ज्ञान मिळवून श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पुस्तक वाचन, चिंतन मनन! पुढे हेच कृतीत उतरवले तर ज्ञान अन धन दोन्ही वृद्धींगत होते.

 

आपल्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर मन शांत, स्थिर आणि प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठीही पुस्तकांसारखा खरा मार्गदर्शक मित्र दुसरा कोणताही नाही. पुस्तकवाचन ही आपल्यातल्या बदलाची पहिली पायरी आहे आणि सर्वांत सोपा प्रगतीचा मार्गही. चक्रवाढ व्याजाप्रमाणे ज्ञानाचे धन वाढवायचे असेल, तर पुस्तकवाचनात गुंतवणूक करा. 

आर्थिक साक्षरता म्हणजे जास्त पैसे कमावणे नव्हे. पाच-सहा आकडी पगार मिळाला किंवा थोडा-फार व्यवसाय करता आला की काम संपत नाही. पैशांचे नियोजन कळाले तरच त्या कमाईला अर्थ असतो. बरेच जण जेव्हा महिन्याला ट्रेनी म्हणून पाच-दहा हजार रुपये पगारात काम करतात, तेव्हा त्यांना बचत किंवा गुंतवणूक आवाक्याबाहेर वाटत असते. आर्थिक चणचणही जाणवते. पुढे महिन्याला हजारो-लाखो रुपये मिळवूनही ताणतणाव, तशीच चणचण जाणवत असेल, तर यालाच आर्थिक निरक्षरता म्हणतात.

गरीब-श्रीमंत यातील सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण. माझ्या मते गरीब म्हणजे तो माणूस जो महिना हजार रुपये ते लाखो रुपये, कितीही कमवू द्या, सर्व खर्च करून मोकळा होतो. श्रीमंत म्हणजे जो उत्पन्नाला बचत, गुंतवणूक आणि गरजेचा खर्च असा समान विभागतो. हे शिकण्यासाठी आपल्या देशात सध्या तरी प्राथमिक किंवा माध्यामिक शाळेत अभ्यासक्रम नाही; पण सरकार आणि संबंधित यंत्रणेने आता हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची गरज आहे. आर्थिक साक्षर होण्यासाठी पहिला आणि महत्त्वाचा विषय म्हणजे वाचन. त्या विषयावर या आठवड्यात चर्चा करू.

जगात जे स्वत:च्या बुद्धीच्या, कष्टाच्या जोरावर अगदी पहिल्या पिढीतच गर्भश्रीमंत झाले किंवा ज्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून कोट्यवधी लोकांचे जीवनमान उंचावले (मग ते राजकारणात, समाजकारणात वा उद्योगधंद्यातील लोक असोत) अशा जवळपास सर्व लोकांमधे एक गोष्ट कॅामन आहे, ती म्हणजे हे लोक अत्यंत चांगले वाचक होते किंवा आहेत. याचसंदर्भात जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि अतिश्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे वॅारेन बफेट. त्यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य कायम कोरून ठेवावे असे आहे. ते म्हणजे “The best investment you can make is an investment in yourself.”

स्वत:मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे काय, तर शाळा-कॅालेज सुरू असताना आणि ते संपल्यानंतर अर्थार्जनासोबत ज्ञानामध्ये सतत वृद्धी करत राहणे. त्यासाठी वाचन, चिंतन, मनन, नियोजन आणि मिळालेल्या ज्ञानाची अंमलबजावणी करत राहणे. पैसे कमवायला सुरुवात केल्यानंतर आर्थिक गुंतवणूक ही भावनांपेक्षा बुद्धी वापरून करायची असते. त्यात स्वत:चीच बुद्धी वापरली तर फायदा अधिक आणि त्यासाठीच पुस्तक वाचन हा सर्वोत्तम आणि सोपा पर्याय. पण जर आपण यशस्वी लोक पाहिले, मग ते उद्योग-व्यवसायातले असो, शास्त्रज्ञ असो, पत्रकार, डॉक्टर, राजकारणी, चांगले शिक्षक, वकील किंवा अन्य कोणीही, ते माहितीपर पुस्तके जास्त वाचतात. त्यातून त्यांचा माणूस म्हणून विकास होतो आणि त्यांच्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानातही वृद्धी होते.

याचा अर्थ असा नव्हे, की ते मनोरंजनपर पुस्तके वाचतच नाहीत, पण त्यात प्रत्येकाचे प्रमाण ठरलेले असते. माझे वैयक्तिक मत असे आहे, की वाचन हे करमणूक किंवा उगीचच वाटेल तेव्हा करण्याची गोष्ट नाही. वाचन ही एक कला आहे, शास्त्र आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाचन म्हणजे Knowledge आणि Wisdom मधला फरक सांगणारे गुपित आहे. पुस्तकाचे वाचन केल्याने तुम्हाला एक वेळ ज्ञान मिळेल; पण ते योग्य वेळी वापरायचे कसे हे फक्त आणि फक्त ते वाचन आत्मसात करून, समजून घेऊन त्याचे मनन, चिंतन केले तरच समजते. वाचनाने तो Wisdom प्राप्त झाला तरच त्या पुस्तक वाचनाला अर्थ असतो.

पुस्तक वाचन ही आपल्यातल्या बदलाची पहिली पायरी आहे आणि सर्वांत सोपा प्रगतीचा मार्गही. चक्रवाढ व्याजाप्रमाणे ज्ञानाचे धन वाढवायचे असेल, तर पुस्तक वाचनात गुंतवणूक करा. मोबाईल, टीव्ही, यू-ट्युब, सोशल मीडिया, गुगलबाबा या सर्वांच्या गराड्यात आपण तोच विचार करतो. ‪तेच योग्य वाटते जे तिथे दाखवले जाते. मी नेहमीच म्हणतो, गुगल किंवा इंटरनेट आपल्याला माहिती देते; पण ज्ञान हवे असेल तर सखोल वाचन, मनन, चिंतन आणि कृती हवीच. ‪बऱ्याचदा आपल्याला टीव्हीवरील चर्चा पाहून किंवा सोशल मीडियावरील ट्रेंड पाहून तेच अंतिम सत्य वाटायला लागते; पण खरे पाहता आपण सारासार विचार करणेच बंद केलेले असते.

‪            उदाहरणादाखल आपण दुपारच्या वेळी टीव्हीवर येणारे काही गुरूंचे शो खरे मानायचे का? अमूक तमूक माणूस घरच्या घरी काम करून महिना दोन लाख कमावतोय, ‘तुम्हीपण कमवा’सारख्या गुगलवर दिसणाऱ्या जाहिराती आपण खऱ्या मानायच्या का? जे जाहिरातीत सांगितले जाते, त्यात थोडे तरी सत्य असते का? ‪टीव्ही, बातम्या, सिनेमे, मालिका किंवा सोशल मीडिया हा तुम्ही त्यांच्याप्रमाणेच विचार करावा किंवा ते दाखवतील त्याच दिशेने विचार करावा असाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून काम करतात.

आपल्याला सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी या सर्व गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे. अतिरेक टाळून फक्त आपल्या ज्ञानात भर पडेल एवढाच काय तो त्याचा वापर करावा. आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात आनंदी राहायचे असेल, शांतपणे अर्थार्जन करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर मन हे शांत, स्थिर आणि प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे असते. ‪त्यासाठीही या धावपळीच्या युगात पुस्तकांसारखा खरा मार्गदर्शक आणि मित्र दुसरा कोणताही नाही.

असे पुस्तकरूपी ‪मार्गदर्शक आपल्याकडे असतील तरी वाचायचा कंटाळा येतो, वाचताना झोप येते म्हणून बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. ‪खरे तर वाचन हे क्रिकेटसारखे असते. त्यातील चेंडू म्हणजे पुस्तक, गोलंदाज हा लेखक समजायचा आणि फलंदाज म्हणजे वाचक. ‪वाचन करताना आपण अलर्ट राहून वाचन करायचे असते, जसे एका फलंदाजाला बॅटिंग करताना तयार राहावे लागते. ‪आपली एकाग्रता, सतत वाचनाची सवय जेवढी चांगली, तेवढा उत्तम परिणाम साधला जातो. जास्तीत जास्त धावा मिळतात, तसे त्यातून चांगले ज्ञान आत्मसात होते. गोलंदाज कोणता चेंडू टाकणार आहे, हे अगोदरच पुस्तकाच्या प्रस्तावनेतून, रिव्ह्यूजमधून आपल्याला बऱ्यापैकी कळालेले असते. गरज असते ती आपल्या चांगल्या वाचनकौशल्यांची.

यापुढे आपण वाचन करताना ते नेमके कसे करावे, वाचताना वेगवेगळे कोणते हेतू असतात, ते का व कसे करावे, वाचताना नेमकी काय काळजी घ्यावी, वाचताना कोणती साधने सोबत असावीत, आर्थिक साक्षरतेसंबंधी कोणती पुस्तके वाचावीत आणि ती कशी निवडावीत याबद्दलही चर्चा करू या.