पैशांचा प्रवाह सूरू असताना त्या काळात बचत करणे हे महाकर्मकठीण काम. ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच, याचे अनंत फायदे अन उपयोग! आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो, हेच आनंदाच्या झाडाचे सिक्रेटही!

पैसे कमावणं जेवढं गरजेचं आहे, त्यापेक्षा जास्त त्या पैशांचं काय करतो, पैसे असताना नक्की कसे वागतो, त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असतं. पैसा दाखवण्याच्या नादात, असा भरमसाट खर्च होतो, की कधी तो हातातून निसटतो ते कळतही नाही. आपल्याकडे पैशांचा प्रवाह सुरू असताना बचत करायला शिकणे, हे अत्यंत महाकर्मकठीण काम. ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखंच आहे

दहाबारा वर्षांपूर्वीची गोष्ट. तो जवळपास माझ्याच वयाचा. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो. येता-जाता लिफ्टमध्ये भेटायचा. प्रचंड श्रीमंत, स्टायलिश. एकदा घातलेले कपडे, घड्याळ वा गॅागल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत. एकदा फेसबुकवर मित्राच्या फ्रेंडलिस्टमध्ये तो दिसला. अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. काही मिनिटांत त्याने ती ॲक्सेप्टही केली. त्या दिवशी मला वेळ नव्हता. एक दिवस पुण्याहून परत येत असताना त्याची फेसबुक वॅाल चाळली… फोटो बघून अवाक् झालो. बीएमडब्ल्यू, मर्सेडिझसारख्या देशी-विदेशी कार, पंचतारांकित हॅाटेल्समधील पार्ट्यांचे फोटो, एखाद्या हिरोलाही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो. थोड्या वेळासाठी का होईना मला असूया निर्माण झाली; पण उत्सुकता मात्र जागी झाली, की हे सगळं इतक्या कमी वयात याने कसं काय कमावलं असेल.

समाजमाध्यमे त्या वेळी फारच बाल्यावस्थेत होती आणि माणसंही पिसाळल्यासारखी करायची. अगदी खडान् ‌खडा माहिती द्यायची त्यावर… त्यामुळे मला लगेच कळाले, की तो एका मल्टिलेवल मार्केटिंग कंपनीत मोठ्या पदावर काम करतो. भारी राहतो. मोठमोठ्या लोकांशी ऊठबस आहे आणि गडगंज पैसेवाला दिसतोय. पुढेही तो अधूनमधून भेटायचा. मला समहाऊ तो फारच रॉयल वाटायचा. त्याचं राहणीमान, एकंदर बोलण्याची, सतत हायफाय लोकं सोबत असल्याचे फोटो पाहून मला अचंबित व्हायला व्हायचं. दर आठवड्याला नवी हॅाटेल्स, भारी गाड्या, पार्ट्यांचे फोटो आणि काय काय… सगळी चंगळ आणि आनंदीआनंद दिसायचा. फेसबुकमुळे त्याची वित्तंबातमी कळायची. काही दिवसांतच मला फेसबुकचा वीट आला. बरीच कारणं होती आणि मी ते माध्यम सोडून दिलं. कामानिमित्ताने राहण्याची जागाही बदलली. त्यामुळे तसा त्यांच्यासोबतचा संपर्कही.

आता पार्ट टू… दोनतीन वर्षांपूर्वी तो मला अचानक दिसला. रिक्षातून उतरला होता. कपडे एकदम साधे. पायात सॅण्डल. मान खाली घालून घाईत कुठे तरी चाललेला… मी त्याला लगेच ओळखले. हाक मारली. त्याला काही वेळ लागला ओळखायला; पण तो माझ्याकडे पाहून कसनुसा हसला आणि तडक पुढे निघून गेला. मला जरा विचित्रच वाटले; पण शंकेची पाल चुकचुकली म्हणून त्याच्याच मित्राचा फोन लावला. मित्राला त्याच्याबद्दल झालेला किस्सा सांगितला आणि मग त्याने जे सांगितले ते असे-‘‘तो एमएलएम करत असताना खूप पैसे कमवायचा. कंपनीचीही मोठी भरभराट झाली. यालाही प्रचंड पैसे मिळायचे; पण हा छानछौकी करत राहिला… ज्या घरात तो राहायचा तेही भाड्याचं होतं. गाड्या सर्व लोन काढलेल्या वा कंपनीतील इतर सहकाऱ्यांच्या असायच्या…

कपडे, दारू पार्ट्या, दिखावा आणि उच्च जीवनमान दाखवण्यासाठी बऱ्याच जणांकडून एमएलएम कंपनीसाठी आलेले पैसे स्वत:च्याच चैनीसाठी उडवले, त्यात पुढे ती कंपनीच बुडाली… याच्या गाड्यांचे हप्ते थकले, ऑफिसचं /घराचं भाडं थकलं आणि लोकांनी, नातेवाईकांनी ज्यांनी ज्यांनी याच्या विश्वासावर पैसे लावले होते ते सर्व याला शोधताहेत. हा आता सतत घर बदलत पळतोय, बायको कधीच सोडून गेलीय आणि हा पूर्ण दारूच्या आहारी गेलाय. जे होतं नव्हतं ते सगळं गेलं. कर्जबाजारी होऊन बसलाय, कदाचित त्याला तर हेही लक्षात नसेल, की तो नक्की कोणाकोणाला पैसे देणे लागतोय… दारूपायी आता काहीही करायला तयार होतो. अगदी जमीनजुमला विकून कफल्लक झालेल्या गावाकडच्या गुंठामंत्र्यांपेक्षा वाईट अवस्था झालीय त्याची. फक्त तोंड लपवत पळणेच काय ते बाकी आहे.’’ मला, हा मोठा धक्का होता.

आपण पैसे कमावणं जेवढं गरजेचं आहे, त्यापेक्षा जास्त आपण त्या पैशांचं काय करतो, पैसे असताना नक्की कसे वागतो, त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असते. ही बुद्धिमत्ता, हे संस्कार आपल्याला शाळेत, कॅालेजात मिळत नसतात. हे शिकणे काही साधी गोष्ट नाही… सर्वशक्तिमान वा खूप हुशार असलेल्या लोकांनाही सत्ता आणि पैसा मिळाल्यानंतर यावर कंट्रोल राहत नाही.

पैसा दाखवण्याच्या नादात, असा भरमसाट खर्च होतो, की कधी तो हातातून निसटतो ते कळतही नाही. पैसा वस्तूंमधून, गाड्यांतून, फेसबुक, इंन्स्टा किंवा इतर कोणत्या फोटोतून नाही, तर आपल्या कृतीतून आणि योग्य गुंतवणुकीतून वाढायला हवा. कोणी कंप्युटरवर हुशार असतो, कोणी ऑटोमोबार्इल्समध्ये बाप असतो, कोणी चित्रकार, कलाकार, चांगला पत्रकार; तर कोणी संशोधक, उद्योजक वा राजकारणी, आपापल्या क्षेत्रात आपण कितीही हुशार असलो, तरी पैशांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कळायला हवी.

पैशापाण्याची ही गोष्ट तशी आयुष्यातील साधी वाटणारी, पण आपल्याकडे पैशांचा प्रवाह सुरू असताना त्या काळात पैशांची बचत करायला शिकणे हे अत्यंत महाकर्मकठीण काम. ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच, याचे अनंत फायदे आणि उपयोग आहेत. या धरणातल्या पाण्यावर पुढे आपल्याला गुंतवणूक करायची असते, पण त्याआधी काही पैशापाण्याच्या गोष्टी शिकायला हव्यात. आर्थिक साक्षरतेसोबत आपण पैसे हाताळतानाच्या बेसिक बाबी पाळायला हव्यात. आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो. हे कायम ध्यानात ठेवा.