पैसा पैसा करता करता आपणही एका कोशात अडकून जातो, काही गोष्टी चांगल्या भावनेने सूरू झालेल्या असतात त्या सूरू रहाव्या म्हणूनही हा ट्विटप्रपंच! प्रायॉरिटीज बदलल्या तरी आपल्यातली माणूसकी जगायला हवी.

आपण लोकांशी कसे वागतो यावरच आपले भविष्य अवलंबून असते. प्रत्येक वेळी पैशांची बचत करताना आपण माणुसकी तर विसरत नाही ना, स्वत: एका कोशात तर अडकले जात नाही ना, याचा विचार करणे गरजेचे आहे. माणसातल्या माणुसकीतली गुंतवणूक आयुष्यात सर्वाधिक परतावा देते, हे कायम लक्षात ठेवायचे. पैसे कमवत असताना पैशासोबत माणसं जोडणं ही सर्वाधिक फायदेशीर गोष्ट आहे. 

सुमित आणि माझी भेट २०११-१२ दरम्यान झाली. आम्ही समवयस्क. एका कॉमन मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भेटलो. दोघांनाही वाचनाच्या आवडीने गट्टी जमली. तो सांगलीत राहायचा. आई-वडील दोघेही शिक्षक. पत्नी आणि हा खाजगी कंपनीत नोकरीला. शेतीभातीही पुरेशी. एकंदर टिपीकल मध्यमवर्गीय कुटुंब. त्या दिवसानंतर परत कधी भेट नाही; पण मधूनअधून कोणते पुस्तक वाचतोय याबद्दल बोलायचो.

अचानक एका रात्री ११.३० वाजता त्याचा फोन आला की वडील, आई आणि पत्नीचा अपघात झाला. त्यांना नवी मुंबईतल्या एका हॅास्पिटलमध्ये दाखल केलं. मी फोन ठेवला आणि तडक हॅास्पिटल गाठले. डॅाक्टरांना भेटलो. सर्व फॉरमॅलिटीज पूर्ण केल्या. सुमितने पुढे सर्व सोपस्कार पार पाडले. मी आमची एक-दोन माणसं त्याला सोबतीला दिली. पुढे काही दिवसांत सर्वांना डिस्चार्ज मिळाला. परत जाताना मात्र वडिलांची एक जखम मोठी होती आणि त्यांचे वय अधिक आणि इतर शारीरिक आजारही असल्याने डॅाक्टरांनी विशेष काळजी घ्यायला सांगितली.

पुढे चार-आठ दिवसांनी सुमितचा मला पुन्हा फोन आला की, बाबांना इथेच एका दुसऱ्या डॅाक्टरांना दाखवले. त्यांनी एक औषध सांगितलेय; पण ते इथे मिळत नाही. मुंबईतून आपल्याला ते मिळेल का? मी प्रिस्किप्शन मागवून घेतले आणि माझ्या काही परिचितांकडे चौकशी केली; पण भेटले नाही. तोही सर्व ठिकाणी चौकशी करत होता; पण कुठेच नव्हते. दुसऱ्या दिवशी मी सहज माझ्या ओळखीच्या एका डॅाक्टरांना विचारले. ते म्हणाले, ‘‘हे भारतात मिळणारच नाही आणि हवे असेल तर युरोपातून आपण मागवू शकतो…’’ मी लगेच ‘हो’ म्हणालो, अगदी काही दिवसांतच ते आम्हाला मिळालेही. मी ताबडतोब ते सांगलीला पाठवून दिले. असेच ते औषध दोन-तीन वेळा त्याने मागितले, मग आम्ही ते पाठवून द्यायचो.

एक दिवस त्याने मला विचारले की, अरे हे औषध आम्हाला कुठेच मिळत नाही, आमचे डॅाक्टरही म्हणाले की ते इथे मिळत नाही आणि तू कसे काय आणतोस? मग त्याला आम्ही नक्की काय करतोय, ते सांगितले. तशी त्या औषधाची किंमत काही फार नव्हती. त्यामुळे मी पण त्याच्याकडून ते पैसे घेतले नाहीत. पण या सर्व प्रकाराने तो अत्यंत आनंदी झाला. थोड्या दिवसांत त्याचे बाबाही पूर्ण बरे झाले होते.

या प्रकरणानंतर पुढे मी व्यवसायात बिझी झालो होतो; तोपण त्याच्या आयुष्यात अडकला… पुढे पाच-सात वर्ष भेटगाठ नाही. कधीतरी सणासुदीला मेसेज यायचे किंवा पुस्तकांचे फोटो आणि रिव्ह्यूज एकमेकांना देत असू.

ब्रेक के बाद

साधारण २०१७ ला आमची एक महत्त्वाची सरकारी टॅक्सची केस सुरू होती. मी प्रचंड तणावाखाली होतो. कारण बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही साहेब आम्हाला काही दाद लागू देत नव्हते. त्यांना जे हवे होते त्यासाठी मी तयार नव्हतो आणि माझ्या पेपर्सवर ते समाधानी नव्हते. बरं भेटीची वेळ दिली तरी दोन-तीन तास बसवून ठेवून ते आमच्या लोकांना हात हालवत परत पाठवून देत. एक दिवस मीच काय तो सोक्षमोक्ष लावायचा या हेतूने त्यांच्या ॲाफिसमध्ये गेलो. मी तसा बऱ्यापैकी अभ्यास केलेला, तरीही रिस्क नको म्हणून आमच्या सीएलाही घेऊन गेलो. आमच्या फार काही चुका नव्हत्या; तरीही ते साहेब त्रास देत होते.

आम्हालाही त्यांनी अगदी तशीच ट्रिटमेंट दिली. फक्त बसवून ठेवलं. चार वेळा आत जायचा प्रयत्न करूनही साधं केबिनमध्येही घेत नव्हते. कसेतरी दोन-अडीच तासाने आम्हाला आत बोलावलं; पण काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत साहेब नव्हते, हे माझ्या लक्षात आलं. मग माझा बऱ्यापैकी आवाज चढला. मी जवळपास भांडायच्याच टप्प्यावर होतो. पाच-दहा मिनिटेच झाली असतील, इतक्यात त्यांच्या केबिनमध्ये त्यांचा शिपाई आला. मला वाटलं आता हे हाकलताहेत आपल्याला. मी शांत झालो; पण त्याने फक्त एक लग्नपत्रिका टेबलवर ठेवली आणि तो गेला.

माझी नजर त्या पत्रिकेवर गेली तर त्यावर निमंत्रक म्हणून सुमितचे नाव. मला काहीच समजेना. मी बळेच महत्त्वाचा फोन आलाय, असे खोटेच सांगून ताबडतोब केबिनमधून बाहेर आलो. लगेच बाहेर येऊन सुमितला फोन लावला, की तू अमुक अमुक साहेबांना ओळखतोस का? तर तो ताबडतोब म्हणाला हो, ते माझ्या बाबांचे विद्यार्थी आहेत आणि माझेही चांगले संबंध आहेत. मी लगेच त्याला माझी पूर्ण स्टोरी सांगितली. हे ऐकताच सुमित मला म्हणाला- तू आता केबिनमध्ये जाऊ नको. मला पाच-दहा मिनिटे दे.

मी आणि आमचे सीए दोघेही बाहेर थांबलो. आमच्या सीएला काहीच कळेना काय चाललेय ते… आणि काय आश्चर्य स्वत: ते मोठे साहेब दुसऱ्या मिनिटाला केबिनमधून बाहेर, मला येऊन तडक मिठी मारली. वर हाताला धरून अत्यंत आदराने केबिनमध्ये घेऊन गेले. आमचे सीए साहेब तर एकदम थंडगार पडले होते. त्यांना नक्की काय चाललेय, तेच कळत नव्हते. सुमित आणि त्या एकंदर कुटुंबीयांबद्दल त्या साहेबांना प्रचंड आदर होता. मग साहेबांनीच सांगितलं की, त्यांचा माध्यमिक शाळा ते महाविद्यालय हा सर्व खर्च सुमितच्या वडिलांनीच केलेला आहे. मला पुढे माझ्या त्यांच्याकडील कामाचे काय झाले, हे पुढे सांगायची गरजच नाही. अत्यंत वायुवेगाने आमची रितसर कामं पार तर पडलीच, शिवाय त्यांनी बरेच चांगले सल्लेही दिले. आमच्या ज्या ज्या चुका होत्या त्या त्या त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितल्या. पुढच्या काळात त्यामुळे आमचे बरेच पैसेही वाचले आणि एकंदर आमच्या चुकाही लक्षात आल्या.

त्या साहेबांबद्दल मला गैरसमज होता की, ते फक्त पैसे खाण्यासाठी आमचे काम करत नव्हते, तर त्यांना वाटायचे ही कंपनी ढिली दिसतेय. यांना थोडं लटकवलेलंच बरं. दोघंही वेगवेगळ्या टोकाचे विचार करत राहिल्याने वाद मिटत नव्हता. पुढे गैरसमज दूर झाले आणि कामही व्यवस्थित पार पडले. आता या वादापेक्षा अधिक गरजेचा ठरतो तो वेगळा मुद्दा, तो आपण पाहू या.

कोण कुठला सुमित, तो मला वाढदिवसाच्या पार्टीत भेटतो काय, पुढे त्याला मी मित्रत्वाच्या नात्याने थोडीफार मदत करतो काय आणि मी ज्याच्याकडे पुढच्या सात-आठ वर्षानंतर लाखो रुपयांच्या केससाठी भांडत असतो, त्या माणसाशी याचा अगदी तसाच माणुसकीचा कनेक्ट निघतो काय…

कोणताही स्वार्थ नाही, गवगवा नाही की जातपात, असूया नाही. तेव्हा कधी स्वप्नातही वाटले नव्हते हे असे काही होईल. हे सर्व आणि सर्व माणुसकी आणि फक्त माणुसकीच्या जादूचे प्रयोग आहेत. अपेक्षा ठेवूनच जर आपण एखाद्याशी ओळख वाढवत असू तर लवकरच ते नातं संपून जातं.

निर्मळ, निर्भेळ हे आजकालच्या काळात फार दुर्मिळ आहे, पण तरीही ‘‘तिकडे स्कोप मोठा आहे.’’ आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण वर्तमानात लोकांशी कसे वागतो यावरच आपले भविष्य अवलंबून असते. प्रत्येक वेळी पैशांची बचत करताना आपण माणुसकी तर विसरत नाही ना, पैसा पैसा करता करता स्वत:च एका कोशात तर अडकले जात नाही ना, याचा विचार करणे गरजेचे आहे. माणसातल्या माणुसकीतली गुंतवणूक आयुष्यात सर्वाधिक परतावा देते, हे कायम लक्षात ठेवायचे. पैसे कमवत असताना पैशासोबत माणसं जोडणं ही सर्वाधिक फायदेशीर गोष्ट आहे. आजही या गोष्टीतील एकएक संदर्भ आठवतो तेव्हा माणुसकीवरचा विश्वास अजून दृढ होत जातो.