इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंटयावरच बहुदा सर्व बुद्धीवंतांची चाचणी होते. परंतु खऱ्या वास्तविक आयुष्यातफायनांशियल कोशंटशिवाय सर्व व्यर्थ आहे! आर्थिक अन व्यावसायिक आयुष्य वाटते तितके सोपे नाही. काटेरी वाट आहे, जपून पावले टाका.

माझ्या उमेदवारीच्या काळात मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिथे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते. फिल्डवर काम करण्याचा त्यांचा दीर्घ अनुभव, थर्मल इंजिनीयरिंगचे परफेक्ट ज्ञान, कष्ट करण्याची तयारी हे त्यांचे बलस्थान होते; मात्र व्यवसाय करताना आर्थिक बाबी, त्याचे परिणाम, धोके, तणाव पचवण्याची ताकद लागते. ती नसल्यास काय होते, त्याची गोष्ट

माझ्या उमेदवारीच्या काळात पहिल्यांदा ज्या कंपनीत ट्रेनी म्हणून मी काम करत होतो, त्या कंपनीत शामसाहेब (नाव बदललेय) नावाचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते. माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षे मोठे. नागपूरच्या व्हीएनआयटीमधून इंजिनीयरिंग केलेले. अत्यंत हुशार, तल्लख. आम्हाला लहान भावासारखे वागवायचे. फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे. पाहिजे ते घ्या म्हणायचे. अक्षरश: धुमाकुळ… आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे कारण मी सांगितलेल्या पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा, की बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यात जाऊनही कुठे काय खावे याविषयी ते मला विचारायचे. कामासाठी त्यांना कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला, तरी उत्तर तयार असायचे. फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनीयरिंगचे परफेक्ट ज्ञान, जबरदस्त कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांची एक वेगळीच हुकुमत होती.

पुढे मी मुंबईत आलो आणि आमच्या गाठीभेटी अजून वाढल्या. मी जरी त्यांच्या कंपनीत नसलो तरी त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत असे.

पुढे साधारणपणे २००७ मध्ये मी या उद्योग-व्यवसायात उतरलो. सुरुवातीला त्यांनी मला विरोध केला. माझे वय कमी आणि कोणतेच आर्थिक पाठबळ नसल्याने खूप अडचणी येऊ शकतात, दुसरे म्हणजे मी निवडलेल्या व्यवसायास फार काही भविष्य नाही हे त्यांचे ठाम मत होते. मी त्यांचा सल्ला ऐकला नाही, याचा राग येऊन त्यांनी वर्ष-दोन वर्षं माझ्याशी संपर्क तोडला. मला त्याचे फार वाईट वाटायचे, बऱ्याचदा मी त्यांना फोन करायचो; पण ते मला टाळायचे. काही कॉमन मित्रांकडे मात्र कायम माझी खुशाली विचारत असत.

साधारणपणे २००९ दरम्यान त्यांचा एक दिवस अचानक फोन आला, ‘कसा आहेस? आणि मी तुला उद्या भेटायला येऊ का?’’ मी कसलाही विचार न करता सर्व कामं बाजूला ठेवून त्यांना हो म्हटले. मला खूप आनंद झाला होता, कारण ते माझे तसे गुरूच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता साहेब ऑफिसमधे हजर. मस्त गप्पा झाल्या, त्यांना आमची प्रगती पाहून मनापासून आनंद झाला. दुपारी जेवण करताना त्यांनी मला अजून एक बातमी दिली, ती म्हणजे त्यांनीही वर्षभरापूर्वी स्वत:चा बॅायलर बनवण्याचा उद्योग सुरू केलाय. नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही भरपूर जेवलो. पूर्वीही तेच पैसे द्यायचे. त्या दिवशीही त्यांनीच पैसे दिले. जायच्या वेळी मी त्यांना गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्या व्यवसायास पुरक अशा आमच्याकडून मुद्दामच काही ऑर्डर्स दिल्या. त्याचा संपूर्ण ॲडव्हान्सही देऊ केला. तो चेक घेताना त्यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आले होते. मी मात्र अत्यंत सद्भावनेनं आणि आपुलकीने शुभेच्छा देऊन त्यांना निरोप दिला.

पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली. आम्ही बरेच रेफरन्सही त्यांना द्यायचो. पुढे अचानक वर्षभराच्या आतच त्यांचा फोन सतत बंद येऊ लागला. वेळेवर मालाची डिलिव्हरीही थांबली. वेळेवर माल मिळत नसल्याने आमच्या पर्चेस विभागाने इतर ठिकाणाहून माल मागवला. ते माझे मित्र असल्याने कोणीही त्यांची तक्रार माझ्याकडे करत नव्हते. मीही कामात इतका व्यस्त असायचो, की या गोष्टीकडे माझे लक्षच गेले नाही. एक दिवस कॅश-फ्लो चेक करताना शाम साहेबांच्या कंपनीऐवजी भलत्याच व्हेंडरला का बरं ऑर्डर देताय, हा प्रश्न मी सहकाऱ्यांना विचारला. तेव्हा त्यांनी साहेबांबद्दल बराच नकारात्मक बाबींचा पाढा वाचला.

दुसऱ्याच दिवशी मी त्यांना फोन केला; पण त्यांच्याशी संपर्कच होईना. सतत चारपाच दिवस पाठलाग केल्यानंतर एक दिवस रात्री ११ वाजता साहेबांचा फोन लागला. मी प्रेमाने सर्व चौकशी केली; परंतु ते दारूच्या नशेत असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी डोंबिवलीतल्या त्यांच्या घराजवळ भेटायचे ठरवून फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी मी सकाळीच तिकडे गेलो. त्यांना भेटलो तर त्यांची अवस्था पाहून मला धक्काच बसला. दाढी वाढलेली. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं. हात थरथरत होते. डोक्यावरचे केस पूर्ण विस्कटलेले आणि कपडे पूर्ण खराब झालेले. ग्रीस आणि फॅक्टरीतले डाग. मी अवाक् झालो. तशातही मी त्यांना आदराने आलिंगन दिले. त्यांच्या हाताला धरून माझ्या गाडीत बसवले आणि एका हॅाटेलमध्ये घेऊन गेलो.

त्यांच्या डोळ्यात मला सर्व काही हरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. थोडा वेळ शांत बसल्यावर मी काहीच बोलत नाही हे ऐकून ते स्वत:च म्हणाले, ‘‘टेक्निकल ज्ञान ऐकायलाच चांगलं रे, आयुष्यात व्यवहारज्ञान पाहिजे!’’

मी काहीच बोलत नव्हतो. त्यांच्या भावनांना वाट मिळावी म्हणून मी फक्त ऐकत होतो. पुढे ते म्हणाले, ‘‘जिद्दीने करायला गेलो, पण पैशांचे गणितच जुळत नाही आता, प्रत्येक ऑर्डरमध्ये नुकसान होतेय. तीन तीन महिने कामगारांना पगार नाही. त्यामुळे बरेचसे सोडून गेले. आता स्वत:च काम करतोय… अकाऊंट पाहू, पर्चेस पाहू, मॅन्युफॅक्चरिंग पाहू, सर्व्हिस पाहू की नवीन धंदा आणू? लोकं काम देतात; पण पेमेंट टर्म्स अजिबात पाळत नाहीत रे. वैताग आलाय! कंपनी चालू करताना घर बॅंकेकडे दिले होते. आता बॅंकेने जप्तीची नोटीस पाठवलीय. म्हणून दिवसा फोन बंद ठेवतो. नाही तर त्यांचे लोक खूप त्रास देतात.

सेल्स टॅक्स भरू शकलो नाही. त्यामुळे वेगळाच मनस्ताप. जुने कस्टमर पहिला टॅक्स भरा तर राहिलेले पैसे देऊ म्हणतात. आता घर चालवायलाच पैसे नाहीत तर हे कुठून भरू? त्यामुळे त्यांच्याकडील उधारीही मिळत नाही. इकडे नवा माल घ्यायला पैसेही नाहीत आणि क्रेडिटही शून्य.’’

‘तुझ्या कंपनीतून मागे दोन लाख आले त्यात मुलांची शाळेची फी भरली. इतर घरखर्च केले. त्यामुळे तुमच्या लोकांना माल देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांचेही फोन घेणे बंद केले. नवीन ऑर्डर जरी आल्या तरी आहे तोच मामला पूर्ण करायला आता पैसे नाहीत. काय करू, कसे करू, काही सुचत नाही. हल्ली तर दोनदोन दिवस घरीच जात नाही. फॅक्टरीतच झोपतो.’’

मला हे सर्व ऐकून त्यांचे जुने दिवस आठवले. किती जिंदादिल माणूस, हुशार, ज्ञानी. एकदम साधासुधा अगदी तुमच्या आमच्या घरातल्यासारखा. मी काही ठाम विचार केला आणि तिथून थेट त्यांच्या फॅक्टरीत जायचे ठरवले. तिथे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स, कॅश फ्लो, खर्च, पर्चेस स्टेटमेंट आणि इतर सर्व आर्थिक बाबी तपासाव्या म्हणून त्यांना डिटेल्स मागितले, तर चक्कर येऊन पडेल असे उत्तर मिळाले… म्हणे गेली दोन वर्षे फायदाच नाही. त्यामुळे हे असे एकत्र काहीच ठेवले नाही… अगदी विखुरलेला डेटा… काही डायरीज आणि कंप्युटरवर साध्या पर्चेस ऑर्डर्स आणि जुजबी कागद… मी जे भेटले ते एकत्र केले. त्याचा अभ्यास केला. आर्थिक अवस्था वाईट होती; पण काही तरी मार्ग काढू म्हटले.

त्यांची सर्वांत मोठी चूक म्हणजे त्यांनी जे मोठे प्रोजेक्ट घेतलेले त्याच्या किमती इतक्या कमी होत्या, की त्यात फायदा मिळवायचा असेल तर डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागणार होते. आपण मराठी लोक बऱ्यापैकी अघळपघळ असतो. फार बारकाईने विचारच करत नाही… त्यात उद्योग हा ‘फायदा’ कमवण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मकच जास्त विचार करतो. त्यांनीही यात काहीही लक्ष न दिल्याने अशाच आर्थिक संकटात अडकले होते.

मी जवळपास दोनतीन दिवस सर्व अभ्यास करून त्यांना काही सल्ले दिले… जी कामं होणारच नाहीत, त्या लोकांना तसे स्पष्ट सांगा, काम करून हवे असेल तर रेट वाढवून घ्या आणि नव्याने सुरुवात करा असे ठरले. एके दिवशी बॅंकेत मी स्वत: त्यांना घेऊन गेलो. तिकडेही सर्व परिस्थिती सांगितली आणि मुदतवाढ घेतली. फायनान्स आणि अकाऊंट्समध्येही बऱ्याच सुधारणा सांगितल्या. पुन्हा आमच्याकडून जी काही मदत करता येईल ती केली.

सर्व काही सुरळीत होईल असे मनोमन वाटत होते आणि दोनेक आठवड्यांत अचानक एका कॅामन मित्राने सुन्न करणारी बातमी दिली ‘‘साहेबांनी आत्महत्या केली.’’

आता काहीच करू शकत नव्हतो. सुन्न झालो होतो. ‘‘Business is a serious affair, Don’t do it for fun or just bcoz others are doing’’ आर्थिक बाबी, त्याचे परिणाम, धोके, तणाव पचवायाची ताकत असेल तरच पुढे या. व्यावसायिक आर्थिक आयुष्य जितके सोपे, चकचकीत दिसते तसे ते नक्कीच नसते. आर्थिक साक्षरता आणि पैशांचे नियोजन शिकाच!