श्रीमंतीफक्त पैशात मोजता आपल्या आजूबाजूला चांगली, सकारात्मक, योग्य सल्ला देणारी, किती कशी लोकं आहेत यावरही ठरते. “पैसा असो की माणसं शॅार्ट टर्म फायदा पाहू नये….. कायम लक्षात ठेवा, लॉंग टर्म गुंतवणूकच अधिक फायदेशीर असते.”

आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो. चांगल्या लोकांचे अनुभव आपली प्रगल्भता द्विगुणीत करते. अनुभवसंपन्न माणसांची संगत ठेवा. मी नेहमी म्हणतो, आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो, याचा खूप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा! सुखी रहाल! चांगल्या मार्गाने पैसे कमवायला लाजू नका. चांगली माणसं जगात असतात, यावरचा विश्वास दृढ ठेवा.

साधारणपणे २००३ च्या गणेशोत्सवादरम्यान आमची टीम भिलाईमध्ये एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्यामोठ्या ॲनलिंग फरसेनच्या एनर्जी कॉन्सरव्हेशन प्रोजेक्टवर काम करत होती. मी प्रोजेक्ट लिड करत होतो. माझ्याकडे आठ-दहा माणसांची टीम. प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी. भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकायला लागायचे. त्यांच्या कामात काही प्रॅाब्लेम नसायचा; पण जेवायला एकत्र बसले की मला हैराण करून सोडायचे.

कंपनीचे मालक स्वत: या कामात लक्ष देऊन होते. त्यांच्याही ही गोष्ट लक्षात यायची; पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे. आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॉर्ड वेळेत पूर्ण केलाच; शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दीड कोटी रुपयांची बचत होईल, अशी नवी सिस्टीम लावून दिली.

निरोपाच्या दिवशी साहेब खूप आनंदी होते. ते अत्यंत सभ्य आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व. प्रचंड ज्ञानी आणि बोलण्यात अत्यंत नम्र. मी जवळपास दीड महिना त्यांच्या कंपनीत होतो. साहजिकच आदर वाढला होता. त्यांनी तिथून निघण्यापूर्वी आमच्या कंपनीचे बॅलन्स पेमेंट मला सुपूर्द केले आणि माझ्या प्रत्येक सहकाऱ्याला भेट म्हणून दहा हजार रुपयांचे पाकीट दिले.

माझ्या काही सहकाऱ्यांसाठी ती रक्कम म्हणजे महिन्याभराचा पगार होता. मी तर कधीच कोणाला एवढे पैसे काम झाल्यावर देताना पाहिले नव्हते.

माझे सर्व सहकारी अत्यंत खुष झाले. गणपतीत गावाला जाता न आल्याचे एक वेगळेच समाधान त्यांना मिळाले होते. आम्ही सर्व गेटजवळ आलो. बाहेर पडणार एवढ्यात सिक्युरिटीजवळ फोन आला, साहेबांनी मला परत बोलावलेय म्हणून. माझे सहकारी गेटवरच माझी वाट पाहत थांबले आणि मी पुन्हा साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. साहेब म्हणाले, ‘‘अरे तू तुझे पाकिट विसरलास, ते घेऊन जायला तुला बोलावले. मला वाटले की तुलाही दहा हजार दिले म्हणून तू रागावलास, म्हणून यात मी अजून पैसे टाकून तुला २५ हजार देतोय.’’

मी नम्रपणे त्यांना म्हणालो, ‘‘सर, मी हे पाकीट विसरलो नव्हतो. रागावलो किंवा रुसलो तर अजिबात नाही. मी माझे काम अत्यंत प्रामाणिकपणे केलेय आणि त्यासाठी मला माझी कंपनी पगार देते. तुम्ही जी वागणूक आम्हाला दिली ती खरंच कुठेच सहजासहजी मिळत नाही. माझ्यासाठी तीच मौल्यवान आहे. माझ्या सहकाऱ्यांना मात्र तुमची भेट खूप आवडली. त्यामुळे तुमचे मनापासून आभार.’’

मी हे बोललो, पण साहेब काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण मी नम्रपणे नकार दिल्याचे त्यांनाही पटले आणि मला आशीर्वाद देऊन जाऊ दिले; पुन्हा भेटण्याचे आश्वासन घेतल्यावरच.

पु ढे दुसऱ्या प्रोजेक्टवर काम सुरू झाले आणि आम्ही सर्वच व्यस्त झालो. साधारण महिन्याभरानंतर एका शनिवारी दुपारी मला त्या साहेबांचा मोबाईलवर फोन आला. मीही आनंदाने घेतला. ते म्हणाले, ‘‘मी मुंबईत आलोय आणि भेटायचेय.’’

मी त्या वेळी खोपोलीमध्ये होतो. त्यांना सांगितले की संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊन भेटतो. पत्ता विचारला तर ते म्हणाले, ‘‘नरिमन पॉईंटजवळच्या ओबेरॅाय होटेलमध्ये ये. संध्याकाळी एकत्र जेवण करू.’’

मलाही त्यांना भेटण्याची इच्छा होतीच. कारण त्यांच्या फिल्डमध्ये ते अत्यंत सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. मी पटापट काम उरकून लवकरच घरी गेलो. चांगले कपडे घातले आणि ओबेरॅायमध्ये जायला निघालो. खरं सांगायचं तर मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, घरी आई-वडिलांना फोन करून सांगितलं. वडील आश्‍चर्यचकित झाल्याचे वाटत होते. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या स्वप्नवत ठिकाणी चाललो होतो. आईच्या सूचना संपत नव्हत्या. ‘‘तू उगीच जास्त मागवू नकोस, बरे दिसत नाही, जपून खा.’’ (खरं तर माझा आहार फार जबराट होता. त्यामुळे नवख्या लोकांना मी खादाड वाटायचो.) त्या आणि इतर अनेक सूचना घेऊन मी शेवटी एकदाचा पोहचलो.

आत गेल्यावर साहेब जवळच सोफ्यावर माझी वाटच पाहत होते. त्यांनी माझी अत्यंत प्रेमाने चौकशी केली. नव्या प्रोजेक्टबद्दलही आमच्या कंपनीला ते ऑर्डर देणार आहेत आणि अनेक नव्या तंत्रज्ञानाबद्दल आम्ही चर्चा केली. तासभर गप्पा मारल्यावर आम्ही जेवायला गेलो.

त्यांना मी प्रामाणिकपणे सांगितलं की, ‘‘मी आयुष्यात पहिल्यांदाच अशा उंची हॉटेलात आलोय. त्यामुळे काही चुकलं तर समजावून सांगा.’’ तसे तेही माझ्यावर खुष होतेच. त्यामुळे ते प्रेमाने सर्व सांगत होते. वेटर आला. त्याने एक मेन्यू कार्ड मला दिले आणि दुसरे त्यांना. मी ताबडतोब मेन्यूकार्ड उघडून रेटच्या रकान्याकडे पाहायला लागलो. ते तिकडे मेन्यूकार्ड न पाहताच धडाधड सुप, स्टार्टर, मेन कोर्स ॲार्डर देत होते. ते मेन्यू सांगत होते, मी त्याचे इकडे दर शोधत होतो. मला बसल्या जागेवर तिथल्या पदार्थांचे दर पाहून गरगरायला झाले होते.

एकाही पदार्थाचे दर न पाहता ते साहेब एवढ्या महागड्या ठिकाणी धडाधड पदार्थ मागवत होते. मला राहावलेच नाही. मी म्हणालो, ‘‘सर पुरे आता… खूप होईल दोघांसाठी हे.’’

त्यावर ते हसले आणि म्हणाले, ‘‘मला माहिती आहे, तुझा डाएट चांगला मोठा आहे, काळजी करू नकोस. भरपूर खा. एक गोष्ट लक्षात ठेव. आर्थिकदृष्ट्या इतका स्वतंत्र हो की, जगातल्या कितीही मोठ्या आणि भारी ठिकाणी जेवायला गेलास तरी मेन्यू कार्डवरील रेट न पाहता जे हवे ते ॲार्डर करायची तुझ्यात आर्थिक ताकद येईल, असे काम कर. माझे मनापासून आशीर्वाद असतील तुला. तुझ्या ज्ञानाचा फायदा फक्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करू नकोस, सोबत आर्थिक सुबत्ता हवीच. तंत्रज्ञानासोबत आर्थिक व्यवहाराचे महत्त्व समजून घे. ते शिकलास तरच या जगात तुला किंमत; नाहीतर सगळे शून्य.’’

खरं तर पुढचे तीन तास ते मला सांगत होते. मी तल्लीन होऊन ऐकत होतो. आज हे जे काही थोडेफार लिहू शकतो, करू शकतो, त्याची मुळं मला भेटलेल्या या अशा महान व्यक्तिमत्त्वात दडलेली आहेत.

त्या दिवशी मनापासून पोटाची आणि मेंदूचीही भूक भागली. पुढे ते माझे अत्यंत जवळचे मेंटॉरही झाले; पण त्यांचे ते वाक्य माझ्या मेंदूवर आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अक्षरश: कोरून गेले. मंडळी गोष्ट साधी आहे- कदाचित मी त्यांच्याकडून ते २५ हजारांचे पाकिट घेतले असते, तर तत्कालिन लाभ झाला असता; पण कदाचित हा आयुष्यभराचा मूलमंत्र त्या वयात मिळाला नसता. त्यांची सोबत, मौल्यवान सल्ले आणि त्यांच्यासारख्या ज्ञानी माणसाची संगत मिळाली नसती.

आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो. चांगल्या लोकांचे अनुभव आपली प्रगल्भता द्विगुणीत करते.

अनुभवसंपन्न माणसांची संगत ठेवा. मी नेहमी म्हणतो, आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो, कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा  परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा! सुखी रहाल! चांगल्या मार्गाने पैसे कमवायला लाजू नका. चांगली माणसं जगात असतात, यावरचा विश्वास दृढ ठेवा.

जेवतानाही जर आपण खरंच पैशांचा विचार करत असू, तर आपल्याला नक्कीच अजून पैसे कमवून आर्थिक स्थैर्य मिळवायची गरज आहे, हे ओळखा. आर्थिक स्वातंत्र्य हे ध्येय ठेवा. सुरुवात हळू झाली तरी चालेल, पण सुरुवात करा. एकमेकांसोबत या विषयावर चर्चा करा, प्रॉब्लेम समजून घ्या, त्यावर हसू नका, वाट चुकलेल्यांना योग्य मार्ग दाखवा. आणि कायम लक्षात ठेवा, ‘‘आयुष्यात सुखी होण्याचा खरा मार्ग आर्थिक स्थैर्यातूनच जातो.’’