थोडं थांबा! विचार करा, आठवड्यातून तासभर वेळ काढा, हिशोब लिहा, बजेट तयार करा. पैशांचे योग्य नियोजन करा. बचतीचे, गुंतवणुकीचे विविध पर्याय पहा. प्रत्येकाची परिस्थिती, प्रायोरिटीज वेगळ्या असतात, लगेच निष्कर्षाप्रत जाण्याची घाई टाळा.

संकटं कधीही गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत; पण आपल्याकडे जर अशा आपत्कालीन परिस्थितीत पैसा असेल तर मात्र त्या संकटावर मात करण्याचे बळ हमखास मिळते आणि त्यासाठीच आपल्याला इमर्जन्सी फंड ही संकल्पना समजून घ्यायला हवी. आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि व्यवहारज्ञान दिले तर ते नक्की आयुष्यभर पुरेल. भाकरीचा प्रश्न मिटला की लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी. म्हणून शिक्षणासाठी वेगळे पैसे बाजूला असावेत. आधुनिक विज्ञानवादी जगात शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे

ही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक साधंसोप्पं गणितातलं सूत्र टाकलं –

‘‘काही गणितं नव्यानं सोडवली तर चांगला फायदा होतो… हे करून पाहा!

उत्पन्न – खर्च = बचत x

उत्पन्न – बचत = खर्च

त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या… सर्वच तशा चांगल्या होत्या; पण त्यात माझे लक्ष वेधून घेतले ते या सूत्राने –

उत्पन्न – गुंतवणूक = खर्च?

हे खरंच इतक सोप्पं आहे का? तसं तर यातही काहीच चूक नाही. जे मी आधीच्या सूत्रातून सांगायचा प्रयत्न करत होतो, ते प्राथमिक शिक्षण असेल तर हे नवे सूत्र म्हणजे त्यातील डॉक्टरेट आहे… मग आपण अगदी बेसिक गोष्टी न शिकता सरळ उत्पन्नातून गुंतवणूक करायला हवी का? हे आणि असे बरेच प्रश्न मला पडले म्हणून हा लेखप्रपंच!

फक्त बॅट-बॉल जवळ असला किंवा टीव्हीवर मॅच पाहून, आपल्यालाही आता खेळ येतोय असे समजून आपणही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचे कॅप्टन बनू शकतो, असे वाटण्यासारखे आहे… बरं तसे स्वप्न पाहण्यातही काही चूक नाही, पण ‘क्रियेविन वाचाळता व्यर्थ’ या म्हणीप्रमाणे आपल्याला त्यासाठी हे सर्व शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला हवे, टप्पाटप्प्याने पुढे जाणे कधीही योग्य. सुरुवातीला स्थानिक क्रिकेट, रणजी किंवा १८ वर्षांखालील सामने आणि मग आंतरराष्ट्रीय सामने, असा प्रवास झाला तर त्यात एकदम तोंडावर पडण्याचे चान्सेस कमी असतात. पुन्हा यात टिकून राहण्यासाठी काही गुण हवे असतात, ते आपण वेळोवेळी वेगवेगळ्या लेखांतून पाहतच आहोत.

या नव्या सूत्रातही गुंतवणूक करण्यासाठी जवळ पैसे असणे गरजेचे असते… बरं ते पैसे कर्जाचे किंवा आई-वडिलांचे वा कोणाकडून उसनेपासने करून मिळवलेले नसतील आणि स्वत:च्या बचतीतून मिळवलेले असतील तर गुंतवणूक करतानाही त्याचे योग्य ‘मूल्य’ कळालेले असते.

आपल्यातल्या बऱ्याच जणांना बचत आणि गुंतवणूक यामधील फरक कळणेही गरजेचे आहे.

आपल्याकडील पैशांची गुंतवणूक करण्याआधी खालील अत्यंत महत्त्वाच्या बाबींची पूर्वतयारी हवी.

१. हल्लीचे धकाधकीचे आयुष्य म्हणजे घाटातील वळणावळणाचा अवघड रस्ता. कोणत्या वळणावर काय होईल याचा काही नेम नाही. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आर्थिक उत्पन्न सुरू होईल, त्या दिवशी प्रत्येक तरुण-तरुणींनी हेल्थ, टर्म आणि ॲक्सिडेंट हे तीन इन्शुरन्स घ्यावेच.

२. संकटं कधीही गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत; पण आपल्याकडे जर अशा आपत्कालीन परिस्थितीत ‘पैसा’ असेल तर मात्र त्या संकटावर मात करण्याचे बळ हमखास मिळते आणि त्यासाठीच आपल्याला इमर्जन्सी फंड ही संकल्पना समजून घ्यायला हवी. बचतीतला काही हिस्सा त्यासाठी आधीच काढून घ्यायला हवा.

३. शिक्षणासाठी गुंतवणूक : आपल्या मुलांना लाडाने देऊ केलेले स्मार्टफोन्स, ब्रॅंडेड कपडे, घड्याळे, सर्व गॅझेट्स कालबाह्य होतील; पण चांगले शिक्षण आणि व्यवहारज्ञान दिले तर ते नक्की आयुष्यभर पुरेल. भाकरीचा प्रश्न मिटला की लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी. म्हणून शिक्षणासाठी वेगळे पैसे बाजूला असावेत. आधुनिक विज्ञानवादी जगात शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

४. रिटायर्डमेंट फंड : सर्वच जण काही सरकारी नोकरी करत नाहीत. उलट आता तर सरकारी नोकऱ्याच नाहीत. त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शन ही संकल्पनाच मोडीत निघेल. अशा परिस्थितीत आपल्याला स्वत:च नियोजन करून आपल्या भविष्यासाठी तजवीज करायची असते. जेवढी लवकर आपण या कामाची सुरुवात करू तेवढे चांगले.  

५. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपण काही कारणांसाठी आधीच कर्ज काढले असेल तर त्यांची वर्गवरी करून जास्त व्याजाच्या कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी त्या बचतीचा वापर करावा.

६. आपण जे काही अर्थाजन करतो, कष्ट घेतो ते आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी. जर आलेल्या पैशातून त्यांना आनंद मिळत नसेल तर मग त्या कमाईला ‘अर्थ’ नसतो. त्यामुळे कुटुंबासोबत बाहेर सुट्ट्यांसाठी जाणे असेल किंवा इतर कोठे फिरायला जाणे असेल, हे करायला हवे. अगदीच साधू-संन्यासीसारखे जीवन जगणे म्हणजे आर्थिक साक्षर, असे अजिबात नाही.

७. स्वत:साठी काही वेगळा फंड जमा करावा. त्याचा वापर आपल्याला हव्या त्या लक्झरीसाठी किंवा अगदी स्वत:च्या शिक्षण, वाचन अथवा आवडीच्या छंदासाठी करता येतो.

आता जोपर्यंत आपण वरील काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करून ती सोय करत नाही तोपर्यंत सरळ आलेले पैसे शेअर मार्केट वा अन्य ठिकाणी गुंतवणे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. शेअरबाजार असो किंवा अन्य कोणतीही आर्थिक गुंतवणूक, काही बेसिक गोष्टींची पूर्तता झाली की मग बिनधास्त होऊन मार्केटमधे उतरा, तोपर्यंत आर्थिक तोटा होईल असे वर्तन टाळायचेच. ‘मार्जिन ऑफ सेफ्टी आणि कॅल्क्युलेटेड रिस्क’ या टर्म्स कधीच विसरू नये.

गुंतवणुकीसाठी पैसा हवा आणि बचतीतूनच तो चांगल्या प्रकारे तयार होतो. तो तुकड्यातुकड्यातही वापरता येतो किंवा एक-रकमीही. (मला वैयक्तिकरीत्या तो ठराविक काळानंतर एकरकमी वापरायला आवडतो.) मित्रहो, बचतीत फार मोठी ताकद असते. आपल्याकडे असलेली बचतच आपल्याला स्थिर बुद्धी देते. नेहमी लक्षात ठेवा, कॅश इज किंग!

गुंतवणूक हा महत्त्वाचा टप्पा आहे, त्यावर आपण विस्ताराने लिहिणारच आहोत.

आता थोडं थांबा. शांतपणे विचार करा. आठवड्यातून तासभर वेळ काढा. सगळे हिशोब लिहा. विचार करा. अंदाजपत्रक तयार करा. पैशांचे नियोजन करा. बचतीचे, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय पाहा. आपल्या प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रायोरिटीज वेगळ्या असतात, मात्र काही समान असतात. अतिमहत्त्वाच्या असतात. सारासार विचार करून मगच निर्णय घ्या. लगेच शेवटच्या निष्कर्षाप्रत जाण्याची घाई करू नका! आणि आता त्याहून महत्त्वाचे, दिवाळीची सुट्टी मस्त एन्जॅाय करा. भरपूर पुस्तकं, दिवाळी अंक वाचा. मजा करा!

सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या शुभेच्छा!