आर्थिकदृष्ट्या यश मिळालं कि गुंड, मवालीही हिरो ठरतात अपयशी झालो कि आपण चांगल्यालाही साधं सिंहावलोकन पण करू देत नाहीत. पैसे कमविणाऱ्याने काही शिकायचं नसतं अन गमावणारा सरळ नालायक ठरतो. या चुकीच्या गोष्टी बदलायला हव्या.

काही वर्षांपूर्वी एका मित्राने त्याच्या आवडीनुसार फॅक्टरी सुरू करण्याचे ठरवले. त्याने जे चित्र डोक्यात बनवले होते त्याचप्रमाणे तो जात राहिला आणि यातच काळाने त्याचा घात केला. परफेक्शन आणि एक्सलन्सच्या लढाईत परफेक्शन हरले होतेजोपर्यंत तो फॅक्टरी लावून तयार झाला, तोपर्यंत त्या धंद्याची गणितं पूर्ण बदलली होती. एका मोठ्या स्वप्नाचा अंत झाला होता. पण झालेल्या चुका दुरुस्त करून तो पुन्हा नव्या उत्साहाने उभा राहिला ते त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या हिमतीवर

आम्ही दोघेही एकाच वयाचे. साधारण २००३ ला आमची व्यावसायिक कारणांनी भेट झाली. बऱ्याच आवडीनिवडी आणि छंद जुळत होते. एकमेकांना बऱ्याच प्रोजेक्टमध्ये मदतही होत होती. त्यामुळे मैत्रीही जुळली ती अगदी आजतागायत कायम आहे. मयूर (नाव बदललेय) एकदम राजबिंडा. गुजराती असला तरी अस्खलित मराठी बोलणारा. उच्चभ्रू वातावरणात वाढूनही माणुसकी आणि माणसं जोडायचा उपजत गुण. त्याचा वडिलोपार्जीत केमिकल्स बनवायचा व्यवसाय; पण त्यात रस नव्हता. तो इंजिनियरिंगमध्ये कायम टॅाप थ्रीमध्ये असायचा. अत्यंत हुशार आणि परफेक्शनिस्ट.

त्याला फॅशन आणि रेडिमेड गारमेंट व्यवसायाची आवड होती. त्याच काळात रेडिमेड कपड्यांची जागतिक बाजारपेठ खुली झाली होती. याचा तसा या विषयावर पहिल्यापासूनच चांगला अभ्यास होता. सुरुवातीला वर्ष-दोन वर्ष आमच्यासोबत नोकरी केली; पण थर्मल इंजिनियरिंगमध्ये त्याचे काही मन रमत नव्हते. लगेच निर्णय घेऊन तो एका मोठ्या गारमेंट फॅक्टरीत कामाला लागला. काही वर्षे तिथे नोकरी केल्यावर टिपिकल गुजराती स्वभावाप्रमाणे स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला.

वडील आणि सर्व कुटुंबीय आनंदी झाले. त्याने साधारण २००७ ला डोंबिवलीला एमआयडीसीमध्ये मोठी जागा खरेदी केली. वडिलांनी तो खर्च उचलला. पुढे लगेच बांधकामही सुरू झाले. आम्ही दोघांनीही जवळपास सोबतच उद्योगाची सुरुवात केली होती. त्याच्या नव्या प्रोजेक्टची युटीलिटीज आणि संपूर्ण हिटींग प्रोसेसची आपसूकच मोठी ऑर्डर आम्हालाही मिळाली होती.

तो मित्र असल्याने मी अगदी पहिल्यापासून त्या प्रोजेक्टचा भाग होतो. त्या काळात तो जवळपास चार एकरवर फॅक्टरी टाकत होता. घरचे प्रचंड मोठे आर्थिक पाठबळ, आई-वडिलांचा विश्वास आणि याची बुद्धिमत्ता, कष्ट घेण्याची तयारी. पुढे बांधकाम सुरू झाले. बांधकामाच्या पद्धतीवरून मला ते फारच अवाढव्य आणि महाकाय होतेय याची जाणीव झाली. त्याला एकदा विचारले तर काही चीनमधील फॅक्टरीचे आणि काही तिरपूर (तामिळनाडू – जागतिक दर्जाचे तयार कपड्यांचे उत्पादन येथे होते.) मोठ्या फॅक्टरीजचे फोटो दाखवले. याप्रमाणेच आपल्याला करायचे आहे, हे पटवून दिले.

जवळपास वर्ष-दीड वर्ष त्याचे बांधकामच सुरू होते. त्यात चार-पाच वेळा तरी मेजर बदल झाले. पाडापाड आणि लेआऊट बदलला… सर्व मशिनरी इंपोर्टेड, त्यामुळे डीलिव्हरी आणि इन्स्टॅालेशनलाही खूप वेळ लागत होता… इंजिनियर्सही परदेशातून येत होते. याला एकदम सर्व परफेक्ट लागायचे. थोडी जरी चूक झाली तरी खूप चिडचिड करायचा, अगदी कित्येक व्हेंडर्सला तो शिवीगाळ करून सरळ काढून टाकायचा. पूर्वी तो असा नव्हता; पण जो उशीर होत होता त्यामुळे त्याचा ताबा सुटायचा. त्यामुळे त्याच्या एकंदर सर्वच कामावर परिणाम होत होता.

हे सर्व होत असताना त्याचे फायनान्शियल प्रॅाब्लेम सुरू झाले होते. कारण जमीन खरेदीसाठी जरी घरातला पैसा वापरला होता, मात्र बांधकाम, मशिनरी आणि इतर सर्व बॅंक लोनवर सुरू होते. बरं खूप चांगलं आणि मोठं करायचं या नादात सिव्हीलवर नको तेवढा खर्च झाला होता… (बऱ्याच वेळा हे होतेच, अगदी घराच्या फर्निचरच्या वेळी आपण सुरुवातीला हात मोकळा सोडतो आणि शेवटी मग पैशाची तंगी सुरू होते.) सांडपाणी प्रक्रिया, सरकारी परवानग्यांचे प्रचंड खर्च आणि त्यात पुन्हा लालफितीचा कारभार, त्याचा अतिरिक्त खर्च. पुढे तर अगदी ट्रान्सफॅार्मर बसवायलाही पैशाची जुळवाजुळव करावी लागत होती.

मी हे सर्व पाहत होतो. वेळोवेळी त्याला कमीतकमी सेटअपमध्ये होईल तेवढे प्रोडक्शन एका बाजूला सुरू कर, याविषयी वारंवार विनंती करत होतो; पण त्याला सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तमच हवे होते. त्यात तो अजिबात कॉम्परमाईज करायला तयार नसायचा. त्याचे वडीलही बऱ्याचदा हतबल व्हायचे; पण याचा आत्मविश्वास इतका होता की, ते पण शांत व्हायचे.

पुढे बॅंकेला समजावून सांगून काही सेटिंग करून कर्ज वाढवून घेतले. अतिशय सुंदर आणि प्रचंड मोठी अशी ती फॅक्टरी सुरू झाली. वेळ लागला; पण मयूरला अगदी हवी तशीच. पण जो प्रोडक्शन लोड यांनी गृहीत धरला होता, तो काही मिळेना. काही आठवडे तर लोड नसल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागला. खरं तर यादरम्यान अनेक लोकांनी आजूबाजूलाच छोटे-छोटे युनिट चालू करून प्रचंड स्पर्धा तयार केली होती. जे जुने युनिट्स होते, त्यांनीही यांच्यासारखे मोठे नसले तरी बऱ्यापैकी सेट-अप लावलेले आणि त्यांचे जुने संबंध असल्याने सर्व ॲार्डर्स तिकडेच जायच्या… कशीबशी याची एखादी शिफ्ट चालायची… कामगारांचा पगार, बॅंकेचे हप्ते, कस्टमरकडून याला पैसे यायला होणारा उशीर आणि त्यातही जर क्वॉलिटीचा काही प्रॉब्लेम आला तर अजून बोंबाबोंब या सर्व कात्रीत तो सापडला होता.

पुढेपुढे याला बॅंकेचे हप्तेही भरता येत नव्हते. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास जाणवायला लागला. वडील, भाऊ, पत्नी सर्व कामाला लागले; परंतु स्पर्धा एवढी वाढली, बॅंकेचा तगादाही एवढा वाढला होता आणि उत्पादनही नसल्याने काही दिवसांत त्यांना ते युनिट बंद करण्यावाचून पर्यायच उरला नाही.

परफेक्शन आणि एक्सलन्सच्या लढाईत परफेक्शन हरले होते… दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक गणितं ही ऊन, पाऊस आणि सावलीच्या खेळासारखी सतत बदलत असतात. बेंजामिन फ्रॅंकलिन म्हणतात त्याप्रमाणे, “Change is the only constant in life, once ability to adopt those changes will determine your success in life.”

मयूर त्या काळात कोणतेही बदल स्वीकारायला तयारच नव्हता, त्याने जे चित्र डोक्यात बनवले होते त्याचप्रमाणे तो जात राहिला आणि यातच काळाने त्याचा घात केला. कारण जोपर्यंत तो फॅक्टरी लावून तयार झाला तोपर्यंत त्या धंद्याची गणितं पूर्ण बदलली होती आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा खरे पैसे कमविण्याची, ग्राहक जोडून ठेवण्याची वेळ होती तेव्हा तो मौल्यवान वेळ त्याने इन्फ्रास्ट्रक्चर बनविण्यात घालवला. त्याच काळात थोडेथोडे प्रोडक्शन सुरू केले असते तर तो बाजारात गुडविल बनवू शकला असता. क्वॉलिटी चेक करू शकला असता आणि पुढे अधिक व्यवसायही करू शकला असता.

एका मोठ्या स्वप्नाचा अंत आम्ही सर्वांनी अगदी डोळ्यांसमोर पाहिला, पण तरीही मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला प्रचंड कौतुक आणि आदर वाटतो तो त्याच्या वडिलांचा, पत्नीचा आणि एकंदर संपूर्ण कुटुंबाचा. कोणत्याही क्षणी ते मयूरवर रागावताना, भांडताना किंवा चिडचिड करताना दिसायचे नाहीत. जे भांडायचे ते दुसऱ्यांसोबत; पण एकमेकांना कायम आधार द्यायचे, एकोप्याने राहायचे.

पुढे ती जागा स्वत:ची असल्याने आणि जागांचा भाव अगदी पटीत वाढल्याने त्या जागेच्या विक्रीतून ते सर्व लोन फेडले. यात मयूरच्या आयुष्यातील चार-पाच वर्षे वाया गेली, कोट्यवधी रुपये खर्च झाले; पण ते डगमगले नाहीत. कुटुंब म्हणून ते एकत्र राहिले त्यातच ते जिंकले.

मयूरनेही हे सर्व अत्यंत सकारात्मकतेने आणि खिलाडूपणे स्वीकारले. आजही तो त्या चुका नम्रपणे कबूल तर करतोच; पण त्यातून शिकून कोट्यवधीचा फायदाही कमवतो. आता तो वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. तिकडे त्याने चांगला जम बसवलाय, आता त्याच्या तीन ठिकाणी फॅक्टरीज आहेत आणि चांगला एक्सपोर्टही करतोय.

आता प्रश्न उरतो, किती मराठी कुटुंबात अशा पद्धतीने आपल्या मुलांना समजून घेतले जाईल, साथ दिली जाईल. खरं तर आपल्या पैशापाण्याच्या गोष्टीचा उद्देश फक्त अधिकाधिक पैसे कमावणे, बचत आणि गुंतवणूक करणे एवढाच मर्यादित नसून एकंदर ही संस्कृती कायमस्वरूपी रूजविणे हा आहे.